रोम, 16 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी ज्वालामुखी उसळल्यानंतर किती नुकसान झालं याचे फोटो समोर आले होते. मात्र आता माऊंट एटनाचा ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. या ज्वालामुखीतून उसळणाऱ्या लावारसाचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. इटलीमधील सिसलीमध्ये स्थित असलेल्या माऊंट एटना ज्वालामुखी पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. रविवारी रात्री ज्वालामुखीतून लावा उसळला आणि हवेत आगीचे गोळे उठल्याचं दृश्यं कॅमेऱ्यात कैद झालं.
माऊंट एटनाच्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर तब्बल 325 फूट उंच आगीचे गोळे हवेत उसळताना दिसले. रात्री 9.30 च्या सुमारास हा ज्वालामुखी सक्रिय झाल्याचं सांगितलं जात आहे. या स्फोटानंतर तीन मैल दूरपर्यंत राख पसरली होती. सिसलीच्या पेदारा ते ट्रेमेस्टेरि इटनिओ खेड्यांमध्ये देखील ही राख पसरली होती त्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. माऊंट एटना हा ज्वालामुखी साधारण 11 हजार फूट उंच आणि 24 मैल रुंद आहे.
माऊंट एटना हा युरोपमधील सर्वात सक्रिय आणि सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीमध्ये झालेल्या स्फोटानंतर रविवारी सकाळपासून भूकंपाचे 17 वेळा धक्के जाणवले आहेत. दरवर्षी या ज्वालामुखीतून इतका लावा येतो की त्यामध्ये 108 मजली इमारत भरली जाऊ शकते. ज्वालामुखीचा दक्षिण-पूर्व खड्डा प्रथम फुटला. या स्फोटात ज्वालामुखीचा दक्षिण-पूर्व कोपरा फुटला आणि ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावा दोन बाजूंनी वाहत गेला. या स्फोटापूर्वी 2.7 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचा धक्का देखील बसला आहे.
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार आजूबाजूच्या खेड्यांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू आहे. तर कर्मचाऱ्यांनी सर्वत्र पसरलेली राख स्वच्छ केली. तर पुढचे काही काळ हा ज्वालामुखी सततत सक्रिय असेल असं काही तज्ज्ञांचं मत देखील असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.