सांगलीच्या लेकाने घराशेजारी उभारलं आईचं मंदिर; नवरात्रौत्सवात असतो मोठा सोहळा

सांगलीच्या लेकाने घराशेजारी उभारलं आईचं मंदिर; नवरात्रौत्सवात असतो मोठा सोहळा

आईचं दर्शन आणि पूजा झाल्याशिवाय ते दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करीत नाही.

  • Share this:

सांगली, 26 ऑक्टोबर : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देत पुढे जाण्याची ताकद देणारी आईची प्रतिमा मंदिरात ठेवून पूजा केली तरी तिचं ऋण आपणं फेडू शकत नाही. सांगलीतील एका लेकाने हे खरं करुन दाखवलं आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्द या गावातील लेकाने घराशेजारीच आईचं मंदिर उभारलं आहे. या मंदिरात नवरात्रौत्सवात देवीच्या जागी आईच्या मुर्तीची पूजा केली जाते. या अवलियाचं नाव अशोकराव शिवाजी वायदंडे असं आहे.

आईची महानता शब्दात सांगता येऊ शकत नाही. तिच्यासाठी कितीही केलं तरी ते कमीच आहे. आईच्या प्रेमाखातर अशोकरावांनी आपल्या घराच्या शेजारी आईचं मंंदिर उभारलं. आईला देवी मानून तो दररोज तिची उपासना करतो. अशोकरावांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अशा परिस्थितीतही त्यांची आई हरुबाई यांनी मुलांना गरीबीचे चटके सोसू न देता संघर्ष करून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.

वेळेप्रसंगी ती उपाशी राहिली मात्र मुलांना काही कमी पडू दिलं नाही. त्यांच्या आईचा देवावर खूप विश्वास होता. चांगली वागणूक असेल तर देव प्रत्येक संकटातून आपल्याला बाहेर काढेल असं त्या नेहमी मुलांना शिकवित होत्या. त्यात नवरात्रौत्सवात तर आई मनापासून देवीची पूजा करायची. 4 ऑक्टोबर 2000 मध्ये नवरात्रौत्सवाच्या सातव्या दिवशी हरुबाईंनी देवीची पूजा केली...आरती केली...आणि माझी जायची वेळ आल्याचे म्हटले. त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झालं, अशी माहिती समोर आली आहे. मातृशोकातून बाहेर येणे अशोकरावांसाठी अवघड होते. मात्र यातूनही ते मुंबईला आले व तेथे सुरक्षा रक्षकाच्या नोकरीत रुजू झाले. त्यानंतर पुढे त्यांनी स्वत:ची सुरक्षारक्षकांची कंपनी सुरू केली आणि आता ते एक्स्पोर्ट आणि इम्पोर्ट कंपनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एबीपीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-देशात पहिल्यांदा YouTube वर हायकोर्टाची Live सुनावणी; जनतेचाही सहभाग

आईच्या आशीर्वादाने कंपनी चांगली सुरू आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईतील कळंबोली आणि हिंगणगाव येथे आईचं मंदिर उभारलं. आईचं दर्शन आणि पूजा झाल्याशिवाय ते दिवसाच्या कामकाजाची सुरुवात करीत नाही. त्यांची पत्नीदेखील आईच्या मंदिरात मनापासून पूजाअर्चा करते. या मंदिरात अशोकरावांनी आईची हुबेहुब मूर्ती स्थापन केली आहे. नवरात्रौत्सवात देवीऐवजी ते आईचीच पूजा करतात.

Published by: Meenal Gangurde
First published: October 26, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या