मुंबई, 27 एप्रिल : बिबट्या आणि माकड हे दोन प्राणी एकमेकांसमोर आले तर नेमकं काय होईल असं विचारलं तर साहजिकच बिबट्या काही क्षणात त्याचा फडशा पाडेल, असंच कुणीही म्हणले (Leopard Monkey Video). कारण या दोघांच्याही ताकदीची कल्पना आपल्याला आहे. बिबट्यासमोर खतरनाक प्राण्यांचाही टिकाव लागत नाही मग माकड काय आहे, असंच वाटेल. पण ज्या माकडाला बिबट्यासमोर कमजोर समजलं जातं त्याच माकडामुळे एका शक्तिशाली बिबट्यालाही घाम फुटला आहे (Leopard attack on monkey).
माकड आणि बिबट्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. माकडाची शिकार करणं एका बिबट्याला चांगलंच महागात पडलं आहे. बिबट्या शिकार करायला आलं तर सर्वांची हवा टाइट होते पण हे माकड मात्र बिनधास्तपणे या बिबट्याला सामोरं गेलं. शिकार करायला आलेल्या बिबट्यालाच उलट त्याने अशी अद्दल घडवली की बिबट्याने स्वतःच हार मानली. @FredSchultz35 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओत पाहू शकता एका झाडावर एक माकड आहे. एक बिबट्या त्याची शिकार कऱण्यासाठी झाडावर चढला. बिबट्या झाडाच्या खोडाच्या थोडं वर तर माकड झाडाच्या टोकावर आहे. आता माकडासमोर पळण्याचा कोणताच मार्ग नाही. खाली जमिनीवर उडी मारली तरी बिबट्याच्या तावडीतून आपण सुटणार नाही. याची कल्पना त्याला होती. त्यामुळे झाडावरच त्याने बिबट्याला मात देण्याचं ठरवलं. भले त्याची ताकद बिबट्याइतकी नाही. पण म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. माकडानेही शक्कल लढवली.
बिबट्या जसा माकडावर हल्ला करण्यासाठी त्याच्या दिशेने गेला तशी माकडाने झाडावर दुसऱ्या बाजूला उडी मारली. बिबट्या पुन्हा त्याच्या दिशेने धावतो. माकड पुन्हा होतं त्या जागेवर उडी मारतं. बिबट्याही त्याच्यामागे जातो. इथून तिथं तिथून इथं उड्या असा माकड आणि बिबट्याचा खेळ बराच वेळ चालतो.
आता उड्या मारणं ही माकडाची सवयच. त्यामुळे इतक्या उड्या मारून त्याला काही फरक पडला नाही. पण बिबट्या मात्र थकला. माकडाचा पाठलाग करून करून त्याला घाम फुटला. शेवटी तो दमून एका जागेवरच शांत बसला. माकडाच्या हुशारीसमोर बिबट्याची ताकदही फेल ठरली.
Published by:Priya Lad
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.