मुंबई, 15 जून- खाण्यापिण्याचे शौकीन असलेल्या मंडळींना आवडणाऱ्या पदार्थांच्या यादीत सध्या मोमोजचं
(Momos) नाव नक्कीच येतंच. मोमोज हा पदार्थ भारतातही खूप लोकप्रिय झाला आहे. मोमोज आणि त्याच्या चटणीचा विचार जरी केला तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटू लागतं. तरुणाई मोमोजची फॅन आहेच; पण मध्यमवयातील लोकांनांही मोमोजच्या चवीने भुरळ घातली आहे. आजकाल बाजारात विविध प्रकारचे मोमोज पाहायला मिळतात. सध्याच्या काळात मोमोज हे सर्वांत लोकप्रिय स्ट्रीट फूड
(Street Food) आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तुम्हालाही मोमोज खायला आवडत असतील तर ही महत्त्वाची बातमी वाचाच.
मोमो खाल्ल्यानंतर तो श्वासनलिकेत अडकल्याने श्वास गुदमरून एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्मिळ घटना समोर आली आहे. त्यानंतर नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स येथील तज्ज्ञांनी मोमोज काळजीपूर्वक गिळण्याचा सल्ला दिला आहे. मोमोज हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे, ते मऊ असल्याने नीट न चावता थेट गिळल्यास श्वास गुदमरून मृत्यूदेखील होऊ शकतो, असं एम्सच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितलंय.

प्रातिनिधीक फोटो
मोमोज खाल्ल्याने श्वास गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील एम्सने हा इशारा दिला आहे. एम्सने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल फॉरेन्सिक इमेजिंग जर्नलमध्ये (Forensic Imaging Journal) प्रसिद्ध केला आहे. मोमोज खाल्ल्याने श्वास गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना एम्सने दुर्मिळ मानली असली तरी, एम्सने लोकांना इशारा दिला आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे वय 50 वर्षे होते आणि पोस्टमॉर्टेम केल्यानंतर महिलेचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनादरम्यान डॉक्टरांना महिलेच्या श्वासोच्छवासाच्या नळीमध्ये मोमोज अडकल्याचं आढळून आलं. त्यामुळे या मोमोजमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.
(हे वाचा:रात्री फास्ट फूड खाल्ल्यानं आरोग्यावर होतो गंभीर परिणाम? अजिबात खाऊ नका 'हे' पदार्थ )
मोमोज खाताना निष्काळजीपणामुळे श्वास गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर एम्सने (AIIMS) हे प्रकरण गंभीर आणि दुर्मिळ मानलं आहे. तसंच एम्सकडून मोमोज खाताना काळजी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. मोमोज मऊसर आणि आकाराने लहान असतात त्यामुळे ते खाताना घशात अडकू शकतात किंवा काही वैद्यकीय अडचणीही उद्भवू शकतात, असं डॉक्टरांचं मत आहे. त्यामुळे मोमोज खाताना ते चावून खाणं आवश्यक आहे. घाईत किंवा नीट न चावता मोमोज गिळणं जीवावर बेतू शकतं, त्यामुळे ते खाताना काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.