अहमदाबाद, 8 फेब्रुवारी : सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल होत असतात. यापैकी काही फोटो, व्हिडिओ मजेशीर आणि मनोरंजक असतात. सेलेब्रिटीज, क्रिकेटर आणि राजकीय व्यक्तींसारखा चेहरा आणि पेहराव असलेल्या अनेक व्यक्तींचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशा पोस्टला नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळताना दिसते. बऱ्याचदा या व्यक्तींचं एखादा सेलेब्रिटी, राजकीय किंवा क्रिकेटर्सच्या चेहऱ्याशी असलेलं साम्य थक्क करणारं असते. सध्या इन्स्टाग्रामवर अशाच एका व्यक्तीचा चेहरा आणि पेहराव लोकांना संभ्रमात टाकताना दिसत आहे. या व्यक्तीचा चेहरा आणि पेहराव पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा आहे. ही व्यक्ती गुजरातमध्ये पाणीपुरी विक्रीचं काम करते. एका व्यक्तीने मोदींसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल केल्यावर नेटकऱ्यांकडून त्याला पसंती मिळताना दिसत आहे. अनेक युझर्सनी या व्हिडिओवर कमेंट्सही केल्या आहेत. `नवभारत टाइम्स`ने याविषयीची माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर सेलेब्रिटी, क्रिकेटर्स आणि राजकीय व्यक्तींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. ही व्यक्ती ग्वाल्हेरमध्ये चाटविक्रीचं काम करते. सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीला पाहून नेटकरी काहीसे संभ्रमात पडले आहेत. ही व्यक्ती गुजरातमध्ये पाणीपुरी विकते. ही व्यक्ती अगदी मोदींसारखीच दिसते. तसंच त्यांचा आवाज पंतप्रधान मोदींच्या आवाजाशी 70 टक्क्यांपर्यंत मिळताजुळता आहे, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
View this post on Instagram
हा मनोरंजक व्हिडिओ करण ठक्कर (eatinvadodara) या इन्स्टाग्राम युझरने 3 फेब्रुवारीला पोस्ट केला आहे. या पोस्टला आतापर्यंत 62 लाख व्ह्यूज आणि 4 लाख 27 हजार लाइक्स मिळाले आहेत. तसंच शेकडो युझर्सनी या व्हिडिओवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
वाचा - अमरावतीच्या श्रद्धाने अमेरिकन नवऱ्याला शिकवला नागिन डान्स; झिंगाट Video
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव अनिल ठक्कर आहे; पण लोक त्यांना मोदी या नावानं ओळखतात. अर्थात त्यामागे काही विशेष कारणं आहेत. त्यांच्या चेहऱ्याच्या एका बाजूची ठेवण आणि पेहराव अगदी पंतप्रधान मोदींसारखा आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ते मोदी असल्याचा भास होतो. ही गोष्ट ठक्कर यांना खूप आवडते. `मोदी चहा विक्रेता होते आणि मी पाणीपुरीवाला आहे. आमच्यात फारसा फरक नाही,` असंदेखील ठक्कर नमूद करतात. 'तुम्ही पाणीपुरीऐवजी चहा विकला असता तर तुम्हीदेखील मोठ्या पदापर्यंत पोहोचला असतात,' असं लोक म्हणत असल्याचं ठक्कर सांगतात. अनिल ठक्कर यांनी वयाच्या 15व्या वर्षापासून पाणीपुरी विक्री सुरू केली. त्यांनी हे दुकान सुरू केलं तेव्हा ते 25 पैशांना पाणीपुरी विकत होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या अनिल ठक्कर यांचा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, `मोदींसारखी दिसणारी व्यक्ती पाणीपुरी विकत आहेत. या व्यक्तीच्या दुकानाचं नाव तुलसी पाणीपुरी असून, ते गुजरातमधल्या वल्लभ विद्यानगरमधील मोठ्या बाजारात आहे,` असं लिहिलं आहे. या पोस्टवर अनेक युझर्सनी कमेंट्स केल्या आहेत. `या व्यक्तीचा आवाज मोदींच्या आवाजाशी 70 टक्क्यांपर्यंत मिळताजुळता आहे.` दुसरा एक युझर लिहितो, `दोघांमध्ये फारसा फरक नाही.` याशिवाय अनेक युझर्सनी ही व्यक्ती मोदींची अगदी कॉपी असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.