न्यूयॉर्क, 1 फेब्रुवारी : प्रसूतीवेळी स्त्रियांच्या सोबत कोणीतरी असावं लागतं. कारण प्रसूती ही गोष्ट सोपी नसते. त्यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, नर्स यांची गरज असते. तसंच प्रसूतीवेळी काय करावं हेही अनेक महिलांना ठाऊक नसतं; मात्र काही वेळा अचानक प्रसूतीची वेळ येऊ शकते. अमेरिकेतल्या एका गरोदर महिलेवर तशी वेळ आली. कार चालवत असताना ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्या वेळी अचानक तिच्या पोटात दुखू लागलं आणि काही कळायच्या आतच तिची प्रसूती झाली.
न्यूयॉर्क पोस्टनुसार, ही घटना नोव्हेंबरमधली असून आता त्याबाबतचा एक टिकटॉक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ खूप व्हायरलही होतोय. आतापर्यंत 12 मिलियन व्ह्यूज त्याला मिळालेत. अटलांटाला राहणारी 23 वर्षांची देशाई फड तिचा 25 वर्षीय पती लॉस्टन फडसोबत बाहेर जात होती. कार ती स्वतः चालवत होती. डॉक्टरांनी प्रसूतीसाठी बराच अवधी असल्याचं सांगितलं होतं; मात्र अचानक तिच्या पोटात दुखू लागलं आणि बाळ बाहेर आल्याचं तिनं पाहिलं असं ती सांगते.
‘काय होतंय हे समजत नव्हतं. ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे कोणाची मदतही घेऊ शकत नव्हती. गाडी पार्क करण्यासाठीही जागा नव्हती. त्या वेळी नवऱ्यानं सांगितलं, की तू मागे बस आणि मी गाडी चालवतो. त्यांनी हर प्रकारे गाडी ट्रॅफिकमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मागच्या सीटवर गेले आणि मी प्रसूत झाले. जवळपास अर्धा तास ज्या परिस्थितीतून मी गेले त्याची कल्पना कोणीही करू शकत नाही,’ असं ती म्हणते.
वाचा - महिलांचे ब्रेस्ट ते रोमान्स यावरही टॅक्स; या विचित्र करांबाबत तुम्हाला माहितीये?
त्यांना मुलगी झाली; मात्र ती जन्मल्यानंतर अजिबात रडली नाही. त्यामुळे ते दोघंही नवरा-बायको घाबरले होते. नवरा गाडी चालवतानाच विचारत होता, की अशा परिस्थितीत काय करावं लागतं. बाळ ठीक आहे का, वगैरे वगैरे. जेव्हा बाळाची चुळबूळ झाली, तेव्हा सगळं व्यवस्थित असल्याची आमची खात्री पटली, असं ती सांगते.
गाडीत प्रसूती झाली, तरी रुग्णालयात जाणं आवश्यकच होतं; मात्र गाडीचा वेग खूप असल्यानं पोलिसांनी वाटेत थांबवलं. त्या वेळी त्यांनी गाडीत एक नवजात अर्भक असल्याचं सांगितलं. नुकतीच प्रसूती झाल्यामुळे आता रुग्णालयात जात असल्याचं सांगूनही पोलिसांचा विश्वास बसेना. शेवटी त्यांनी पाहिल्यावर त्यांची खात्री पटली व त्यांनी बाळ व आईला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली. यामुळे बाळ व आई दोघीही आता सुखरूप आहेत. गाडीमध्ये असताना अचानक झालेल्या प्रसूतीने घाबरून न जाता त्या महिलेनं धीरानं परिस्थिती हाताळली, याचं सर्वांनी कौतुक केलंय. व्हिडिओही भरपूर लोकप्रिय झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.