सध्या जगभरातील लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांच्या क्षणात नोकऱ्या गेल्या आहेत. कर्मचारी कपातीचा सर्वांत जास्त फटका टेक सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना बसला आहे. टेक जायंट गुगलनंही आपल्या 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीतून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी ट्विटर आणि लिंक्डइनसारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपलं मन मोकळं केलं आहे. गुगलच्या एका माजी कर्मचाऱ्याची लिंक्डइन पोस्ट आता व्हायरल झाली आहे. जोएल लिच (Joel Leitch), असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, तो 16 वर्षे गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. 'नवभारत टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
कंपनीनं अचानक काढून टाकल्यानंतर बहुतांश कर्माचारी कंपनीवर टीका करतात. कंपनीबद्दल वाईट बोलतात. पण, जोएल याला अपवाद ठरला आहे. गुगलनं त्याला एका झटक्यात कंपनीतून काढून टाकल्यानंतर त्यांनं सोशल मीडियाचा आधार घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या बोलण्यानं सर्व युजर्स चकित झाले आहेत. कारण, काढून टाकल्यानंतर जोएलनं कंपनीची बदनामी केली नाही. उलट कंपनीच्या कामाचं आणि तिथून मिळालेल्या शिक्षणाचं त्यानं कौतुक केलं आहे.
जोएलनं पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यानं जानेवारी 2005 मध्ये इंटर्न म्हणून गुगलमध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर 16 वर्षे सात महिने त्यानं पूर्ण क्षमतेने कंपनीत काम केलं. ही त्यांची पहिलीच कंपनी होती, ज्यात तो कर्मचारी म्हणून रुजू झाला होता. 10 जुलै 2006 रोजी तो कंपनीचा पूर्णवेळ कर्मचारी झाला होता. जोएलच्या मते, गुगल अजूनही खूप चांगली कंपनी आहे. तिथे खूप चांगले आणि प्रतिभावान लोक काम करतात.
जोएलनं आपल्या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं, "दोन आठवड्यांपूर्वी माझी संपूर्ण टीम गुगलच्या कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झाली आहे. हा माझ्यासाठी एक मोठा धक्का आहे. मला अजूनही आश्चर्य वाटतं की, गुगलनं इतक्या अनुभवी, हुशार, प्रतिभावान, ग्रिटी आणि चांगली कामगिरी करणार्या कर्मचार्यांना एकाचवेळी कसं काढून टाकलं."
हेही वाचा - हेलिकॉप्टरने एंट्री अन् 12 गाड्यांचा ताफा, सूनबाईचे स्वागत पाहून अख्खं गाव पाहातच राहिलं
गुगलचे आभार मानताना जोएलनं पुढे लिहिलंय, "मला इंटर्न म्हणून ठेवण्याची जोखीम घेतल्याबद्दल कंपनीचे धन्यवाद. इतकी वर्षे तिथे काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मला माझ्या सहकार्यांची सर्वांत जास्त उणीव भासेल. त्यांच्याशी माझं एक मजबूत नातं निर्माण झालं आहे."
या शिवाय, जोएलनं तिथं काम करणार्या कर्मचार्यांना चांगलं काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या युजर्ससाठी काय चांगलं आहे, याची नेहमी काळजी घेतली पाहिजे. कर्मचार्यांनी युजर्स आणि कंपनीचे संबंध सुधारण्याचं काम केलं पाहिजे, असं त्यानं सांगितलं. शेवटी त्यानं लिहिलं की, गुगलनं आपल्या रुपात एक समर्पित कर्मचारी गमावला आहे. काही दिवसांपूर्वी लिंक्डइनवर पोस्ट केलेल्या जोएलच्या या पोस्टला बातमी लिहेपर्यंत हजारो लाईक्स, शेकडो शेअर्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Job, Viral news