मुंबई, 26 डिसेंबर : सोशल मीडिया एक असं माध्यम झालं आहे, जिथे एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर ती अवघ्या काही क्षणात लाखो-करोडो लोकांपर्यंत व्हायरल होते. त्यात जर व्हिडीओ लहान मुलाचा असेल, तर त्याला तुफान लाईक, शेअर केलं जातं. अशाच एका चिमुकल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या चिमुकल्याने तबल्यावर धरलेल्या ठेक्याने सर्वच जण हैराण आहेत.
तबला वाजवणाऱ्या चिमुकल्यासोबत त्याची आई असल्याचा अंदाज आहे. त्याची आई एक मराठी भीमाचं गाणं गात असून, त्या गाण्यावर चिमुकला ठेका धरत तबला अगदी ताला-सुरात वाजवतो आहे. या लहानग्याचा व्हिडीओ पाहून सर्वच जण हैराण असून त्याला भविष्यातील झाकीर असल्याचंच संबोधत आहेत.
या उस्तादाचा हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु व्हिडीओतील संपूर्ण गोष्टी, मराठी गाणं आणि त्यासभोवतालचं वातावरण पाहून हा व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज आहे.
चिमुकल्याच्या या कलेला सर्वच नेटकऱ्यांकडून जबरदस्त दाद मिळत असून त्याचं मोठं कौतुक आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान गाजला असून त्याचा उस्ताद- झाकीर अशा नावांनी उल्लेख केला जात आहे.