गुजरात, 07 जून: कोणताही प्राणी नैसर्गिक आहाराव्यतिरिक्त अन्य कोणतेही अन्न भक्षण करत नाही, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत असं काहीतरी आढळतं. तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असंच एक आश्चर्य गुजरातमधील (Gujarat) कच्छच्या रणात (Rann Of Kutch) पहायला मिळतं. इथं काळा डुंगर पर्वतावर असलेल्या श्री दत्तात्रय मंदिराच्या (Shri Dattatreya Temple) आवारात कोल्हे चक्क भात-खिचडी खाताना दिसतात. आजकालची नव्हे तर तब्बल 200 वर्षांपासूनची ही परंपरा असून भगवान दत्तात्रेयांनीच कोल्ह्यांना हा प्रसाद खाण्याची अनुमती दिल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे. कोल्ह्यासारखा प्राणी भात खिचडी खात असल्यानं हा चर्चेचा विषय ठरत असला तरी गेल्या काही वर्षात पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळं इथं येणाऱ्या कोल्ह्यांची (Jackals) संख्या घटल्याचं आढळलं आहे.
काळा डुंगर हा पर्वत (Kala Dungar Mountain) गुजरातमधील कच्छपासून 25 किलोमीटरवर आहे. गिर्यारोहणासाठी येथे अनेक पर्यटक (Tourist) येत असतात. श्री दत्तात्रेय मंदिर हे या भागातील अजून एक आकर्षण. या मंदिराच्या परिसरात दररोज संध्याकाळी काही कोल्हे भात खिचडीचा (Rice Khichadi) प्रसाद खाण्यासाठी येतात.
इंडिया टुडे टिव्हीच्या वृत्तानुसार, याबाबत निमिशा श्रीवास्तव यांनी संशोधन केले आहे. काळा डुंगर परिसरात कोल्ह्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतू 2003 मध्ये भूजमध्ये भूकंप (Earthquake) झाला. त्यानंतर कोल्ह्यांची संख्या कमी झाली. मी या भागात संशोधनासाठी आले तेव्हा मला फक्त 2 कोल्हे दिसले. त्यानंतर मी स्थानिक मालधारी समाजातील काही व्यक्तींशी याबाबत संवाद साधला. त्यांच्याकडून मी कोल्ह्यांची संख्या का घटलीय, त्यामागे काही आजार कारणीभूत आहे का याबाबत संवाद साधला. मात्र याबाबत काही शोध लागला नाही.
हेही वाचा- काय सांगता ! फक्त एक आंबा हजार रुपयाला... 'या' आंब्याची सगळीकडे चर्चा
याबाबत कच्छ पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक हर्ष ठक्कर यांनी सांगितले की, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आता या मंदिर परिसरात कोल्हे फारसे दिसून येत नाहीत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांची संख्या कमी झाली आहे. आजही काळा डुंगर पर्वताच्या परिसरात बरेच कोल्हे दिसतात.
याबाबत श्री दत्तात्रय मंदिराचे प्रमुख हिरालाल खेवडा यांनी सांगितले की, पूर्वी 60 ते 70 कोल्हे मंदिर परिसरात खिचडीचा नैवेद्य खायला येत असत. मात्र गेल्या काही वर्षांपासून कोल्हे येतातच असे नाही आणि आले तरी त्यांची संख्या नगण्यच असते. त्यामुळे ही बाब चिंताजनक म्हणावी लागेल. कोल्ह्यांना खिचडी खाऊ घालण्याची 200 वर्षांपासूनची प्रथा आहे. मंदिराजवळ लोग प्रसाद ओटलो (Log Prasad Otlo) हे प्रसाद ठेवण्याचे ठिकाण असून तेथे रोज कोल्हे येत असतात. सध्या कोल्हे येथे येत नाहीत. मी 72 वर्षांचा आहे. लहानपणापासून मी येथे कोल्ह्यांचा वावर पाहत आहे. कोल्ह्यांचे खिचडी खाण्याचे किस्सा माझे पूर्वजही सांगायचे. मात्र गेल्या 8 ते 10 वर्षात या भागात पर्यटकांची संख्या वाढली. पर्यटक कोल्ह्यांचे फोटो काढतात. त्यामुळे कोल्ह्यांची संख्या कमी झाली असावी.
ही परंपरा कशी सुरु झाली असावी?
हिरालाल राजदे खेवडा यांनी सांगितलं की, काळा डुंगर परिसरात श्री दत्तात्रेय भ्रमंतीसाठी येतात असा विश्वास आहे. या भागात कोल्ह्यांना पुरेसे अन्न मिळत नसल्यानं त्यांची उपासमार होत होती. तेव्हा भगवान श्री दत्तात्रेयांनी कोल्ह्यांना खुणावत, इथं ये आणि हे खा असं सांगितलं. तेव्हापासून ही परंपरा पडल्याचं मानलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujarat, PHOTOS VIRAL