नवी दिल्ली, 28 मे : मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया (MasterChef Australia) हा पाककला क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत लोकप्रिय असा रिअॅलिटी शो आहे. आगळे-वेगळे पदार्थ सादर करण्यासह दिलेल्या पदार्थांपासून वेगळा पदार्थ बनवणं अशी विविध आव्हानं यात असतात. जगातील अत्यंत नावाजलेले शेफ यात परीक्षक म्हणून काम करतात. अशा या शोच्या 13 व्या पर्वात सध्या भारतीय शेफ दीपिंदर छिब्बर (Depinder Chhiber)आपल्या आगळ्या-वेगळ्या पाककृतींनी परीक्षकांसह खवय्यांचंही मन जिंकत आहे. दीपिंदरनं सादर केलेली एक जबरदस्त रेसिपी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही डिश आहे ग्रीन करी केक विथ चॉकलेट चिली गनाश (Green Curry cake with Chocolate Chilly Ganache) आणि नारळ आईस्क्रीम (Coconut Ice-Cream).
दिपिंदरला कांद्यापासून (onion) काहीतरी वेगळी डिश बनवण्यास सांगण्यात आलं होतं, तर तिनं चक्क त्यापासून केक (Cake) बनवला. तिची ही अफलातून डिश परीक्षकांना अतिशय आवडली आहे. या आधी तिनं सादर केलेल्या छोले, पराठा आणि कढाई पनीर या स्वादिष्ट पदार्थांनी परीक्षक जॉक झोनफ्रिलो (Jock Zonfrillo), मेलिसा लेओंग (Melissa Leong) आणि अँडी अॅलन (Andy Allen) यांना चांगलंच प्रभावित केलं होतं. ही एक तगडी स्पर्धक आहे, तिला हरवणं कठीण आहे, असं परीक्षक जॉक झोनफ्रिलो यांनी म्हटलं होतं. आता या ग्रीन करी केकनं त्यांना फारच प्रभावित केलं आहे. कांद्यापासून गोड आणि चटकदार अशी ही एकदम वेगळी डिश बनली आहे, अशी प्रतिक्रिया अँडी अॅलन यांनी दिली, तर लेओंग यांनी करी आणि केक एकत्रित आणून एक उत्तम डिश बनवल्याचं सांगितलं. झोनफ्रिलो यांनीही ही डिश एकदम आवडली असल्याची प्रतिक्रिया दिली.
View this post on Instagram
दिपिंदर छिब्बरने तिच्या इन्स्टाग्रामवर (Instagram) या डिशचे फोटो शेअर केले आहेत. ‘कोणाला प्रश्न पडला असेल, की याची चव कशी असेल, तर याची चव एकदम वेगळी आहे, असं तिनं लिहिलं आहे. थाई करी कधी मिष्टान्नाची चव देईल, असं कधीही वाटलं नव्हतं असंही तिनं म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर खवय्यांच्या भरभरून कमेंट्स येत असून, थाई करीपासून बनलेल्या या अनोख्या केकबाबत लोकांना अतिशय आश्चर्य वाटत आहे.
करी हा मुख्य घटक असलेली ही डिश इतकी उत्तम झाल्याबद्दल लोक तिची प्रशंसा करत आहेत. एका खवय्यांनं तिला ‘मसाला मास्टर’ (Spice Master) म्हटलं आहे. प्रत्येकजण या अनोख्या डिशचा आस्वाद घेण्यास उत्सुक असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे.
View this post on Instagram
दहा वर्षांची असताना 2002 मध्ये दिपिंदर छिब्बर कुटुंबासह ऑस्ट्रेलियात (Australia) वास्तव्यास गेली. 29 वर्षीय दिपिंदर सध्या सिडनीमध्ये (Sydney) फार्मसिस्ट म्हणून काम करते. तिच्या पाक कौशल्याची चांगलीच प्रशंसा झाल्यानं आता ती स्वत:चं आउटलेट सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतीय पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवण्याची तिची इच्छा असून, भविष्यात भारतातील विविध प्रांतातील खास पाककृतीवर एक पुस्तक लिहिण्याचा तिचा मानस आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.