नवी दिल्ली, 28 जानेवारी : आजच्या कॉर्पोरेट जगात तरुण मुलं-मुली स्वतःला अधिक सक्षम आणि व्यग्र समजतात. स्वतःच्या वेळेचं मोल खूप जास्त आहे, असं त्यांना वाटतं. दुसरीकडे, घरातले ज्येष्ठ नागरिक, वृद्ध आई-वडील यांना काहीही काम नाही, त्यांच्याकडे खूप मोकळा वेळ आहे, त्यांच्या वेळेला किंमत नाही, असा विचार नोकरी करणारे अनेक तरुण-तरुणी करतात; पण सावधान, असा विचार तुम्हीही करत असाल, तर तुम्ही मोठी चूक करत आहात. कारण घरातल्या ज्येष्ठांना महत्त्व न देणं त्रासदायक ठरू शकतं.
ज्येष्ठ मंडळींनी स्वत:हून त्यांच्या वेळेची किंमत ठरवली, तर कॉर्पोरेट संस्कृतीला महत्त्व देणाऱ्यांना नेमकं काय करावं, हे समजणार नाही. असाच काहीसा अनुभव एका तरुणीला आला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. एका वृद्ध महिलेने तिच्या मुलीच्या मुलीला म्हणेजच स्वतःच्या नातीला सांभाळण्यासाठी स्वतःच्या मुलीकडे ताशी तब्बल 1600 रुपये शुल्क आणि विविध गोष्टींची मागणी केलीय. या मागणीनंतर संबंधित महिलेची मुलगी गोंधळून गेलीय. ही मुलगी ऑफिस आणि इतर कामात खूप व्यग्र असल्यानं तिनं स्वतःच्या मुलीला सांभाळण्यासाठी स्वतःच्या आईला विनंती केली होती.
हेही वाचा - टेडी बेअरच्या प्रेमात पडली महिला; अनोख्या Love Story ची सर्वत्र चर्चा
हा प्रकार भारतातला नसला तरी आपल्यासाठीही जवळचा वाटतो. हा प्रकार ब्रिटनमधला आहे. संबंधित मुलीच्या आईने स्पष्ट केलं आहे की, ‘नातीला सांभाळण्यासाठी पैसे न दिल्यास तिला सांभाळणार नाही.’ दुसरीकडे, आता महिलेची मुलगी म्हणते आहे की, ‘मी आणि माझा नवरा दोघंही नोकरी करतो. आम्ही दोघंही स्वतःच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. माझी आई 64 वर्षांची आहे आणि ती कुठेही नोकरी करत नाही. तिच्याकडे खूप वेळ आहे, म्हणून मी तिला माझ्या मुलीची काळजी घेण्यास सांगितलं. आता ती त्यासाठी 16 पौंड (1600 रुपये) प्रति तास शुल्क मागत आहे.’ 'हार्ट डॉट को यूके' नावाच्या वेबसाइटनं हे वृत्त दिलंय.
महिलेनं मुलीकडे स्वतःच्या नातीला सांभाळण्यासाठी पैसे मागितल्यानंतर आता संबंधित महिलेची समजूत घालण्याची जबाबदारी मुलीवर आलीय. दुसरीकडे, संबंधित महिलेनं स्पष्ट केलं, की नातीला सांभाळण्यासाठी 1600 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त ती विलंब शुल्कदेखील आकारणार आहे. याशिवाय, तिला कारमध्ये वेगळी सीट, स्टोलर, बाटली आणि इतर गोष्टी हव्या आहेत. कारण ती त्या साफ करणार नाही आणि पुन्हा वापरणार नाही. स्वतःच्याच आईनं अशी मागणी केल्यामुळे मुलीला नेमकं काय करावं, हेच सुचत नाही. आता ती आईची समजूत घालण्यात व्यग्र आहे. इतकं शुल्क दिल्यास ती कर्जबाजारी होईल, असंही तिला वाटतं.
हेही वाचा - चुकीच्या व्यक्तीसोबत घेतला पंगा; मुलाने चोरांनाच पळवून पळवून मारलं, Video तुफान व्हायरल
ती म्हणते की, ‘माझी आई माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी तयार झाली नाही, तर मला माझ्या मुलीला डेकेअरमध्ये ठेवावे लागेल. कारण तिथे थोडं कमी शुल्क असू शकतं. मी नोकरी करते, त्यामुळे मला कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीची गरज आहे. आमच्या कुटुंबातला प्रत्येक जण नऊ ते पाच या वेळेत नोकरी करतो आणि त्यामुळेच मला कोणीही मदत करू शकत नाही.’
ब्रिटनमध्ये ही बातमी खूप व्हायरल झाली असून त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट आल्या आहेत. कमेंट करणाऱ्यांमध्येही दोन गट दिसत आहेत. काही जण मुलीची बाजू घेत आहेत, तर काही जण मुलीच्या आईची बाजू घेत आहेत. आईने नातीला सांभाळण्यास नकार दिल्यानं संकटात सापडलेल्या मुलीने एका कमेंटला उत्तर देताना लिहिलं आहे की, ‘मी चूक आहे का? माझ्या मुलीची काळजी स्वतःच्या आईला घेण्यास सांगणं चुकीचं आहे का? माझी आई दिवसभर घरीच असते. तिला काम नाही, ती फक्त स्वयंपाक करते. माझ्यावर विश्वास ठेवा, याशिवाय तिला कोणतंही काम नाही. ती दिवसभर टीव्ही पाहत असते. मग माझ्या मुलीची तिने फुकट काळजी घ्यावी, असं सांगणं चुकीचं आहे का? मी आणि माझे पती गरज म्हणून नोकरी करण्यात व्यग्र आहोत.’
यावर एका युझरने कमेंट केली आहे की, ‘माफ करा तुम्हाला थोडं कटू वाटेल; पण तुम्ही मुलीची काळजी घेण्यास सक्षम नव्हता, तर मुलीला जन्माला का घातलं? आणि तुमचा बराच काळ नोकरी करण्याचा विचार असेल, तर तुम्ही गरोदरपणातच आईशी बोलायला हवं होतं.’ आणखी एका युझरने लिहिलं आहे की, ‘तुमच्याबाबत घडलेल्या घटनेवरून असं दिसतं आहे की, तुम्ही डेकेअरची सुविधा घेऊ शकता; पण तुमच्या आईनं नातीची मोफत काळजी घ्यावी, असं तुम्हाला वाटतं’. आणखी एका युझरने कमेंट केली आहे की, ‘तुझ्या आईनं घेतलेली भूमिका योग्य आहे. कारण तिने तुम्हाला वाढवलं आहे, खाऊ घातलं आहे. आता तुमची पाळी आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Viral, Viral news