नोकरी गेल्यानं सुरू केला व्यवसाय, 30 रुपयात पोटभर स्वादिष्ट जेवण देणारा ‘इंदू का ढाबा’ रातोरात प्रसिद्ध

नोकरी गेल्यानं सुरू केला व्यवसाय, 30 रुपयात पोटभर स्वादिष्ट जेवण देणारा ‘इंदू का ढाबा’ रातोरात प्रसिद्ध

‘इंदू का ढाबा’ची (Indu ka Dhaba) थाळी (Thali) अल्पावधीतच लोकप्रिय झाली. इंदूनं ट्विटरवर आपल्या ढाब्यावरील थाळीच्या फोटोसह, ‘नोकरी गेल्यामुळे ढाबा सुरू केला असून, अवघ्या तीस रुपयांत थाळी देत आहे,’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : ‘कोशिश करने वालों की हार नहीं होती’ असं म्हणतात. सध्याच्या कोरोना काळात तर अनेकांनी हे सिद्ध केलं आहे. गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या साथीनं (Corona Virus Pandemic) न भूतो न भविष्यती असा कहर मांडला आहे. सगळ्या जगाचं अर्थचक्र यानं पार कोलमडवून टाकलं. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात अनेक देशांना लॉकडाउनचा (Lockdown) कठोर पर्याय अवलंबवायला लागला. यामुळं सर्व उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय ठप्प झाले. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. अल्प उत्पन्न असणाऱ्या, हातावर पोट असणाऱ्या लोकांना जगणं कठीण झालं.

लॉकडाऊनच्या त्या भीषण कालावधीनंतर गाडा रुळावर येत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पुन्हा एकदा भीषण परिस्थिती ओढावली आहे. अशा या सगळ्या संकटमय काळातही काही लोक नेटानं उभे राहिले आहेत. आपला धीर खचू न देता त्यांनी ओढवलेल्या परिस्थितीशी चार हात करत आपलं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती, असं म्हणतात. त्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत साध्या लोकांनी आपलं जग पुन्हा वसवलं आहे. अशी माणसे सर्वांनाच प्रेरणा देत आहेत.

टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, हिमतीनं पुन्हा उभ्या राहणाऱ्या इंदूची कहाणी सध्या सोशल मीडियावर गाजते आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh)कानपूरमधील (Kanpur) इंदू या महिलेची नोकरी या कोरोना काळात गेली. पण त्यामुळे खचून न जाता तिनं एक ढाबा सुरू केला. तिथं अवघ्या तीस रुपयात तिनं स्वादिष्ट आणि पोटभर जेवण देणं सुरू केलं. तिची ‘इंदू का ढाबा’ची (Indu ka Dhaba) थाळी (Thali) अल्पावधीतच लोकप्रिय झाली. इंदूनं ट्विटरवर आपल्या ढाब्यावरील थाळीच्या फोटोसह, ‘नोकरी गेल्यामुळे ढाबा सुरू केला असून, अवघ्या तीस रुपयांत थाळी देत आहे,’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

तिच्या या पोस्टची नेटिझन्सनी तात्काळ दखल घेत, आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी इंदूच्या हिमतीला दाद देत तिचं कौतुक केलं आहे. तिची थाळी अतिशय छान दिसत असून अवघ्या तीस रुपयात अशी थाळी देणं कौतुकास्पद आहे, असं काहींनी म्हटलं आहे. तर अनेकांनी तिचं अभिनंदन करत तिच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 40 हजार लोकांनी या पोस्टला पसंती दर्शवली असून 5500हून अधिक लोकांनी रिट्वीट केलंआहे. सोशल मीडियामुळे काही लोकांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळते. तसाच अनुभव इंदूच्या बाबतीत आला असून सोशल मीडियामुळे उत्तर प्रदेशातील ‘इंदू का ढाबा’ जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. इंदूची जिद्द, हिंमत अनेकांना प्रेरणा देत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 17, 2021, 11:33 AM IST

ताज्या बातम्या