VIDEO: 'बनारसवाला' पानही विसराल! याठिकाणी मिळतंय चक्क Gold Paan, वाचा काय आहे किंमत

VIDEO: 'बनारसवाला' पानही विसराल! याठिकाणी मिळतंय चक्क Gold Paan, वाचा काय आहे किंमत

पान म्हटलं की ‘पान खाए सैंया हमारो’, ‘खाई के पान बनारसवाला’ ही हिंदी चित्रपटांतील गाणी हटकून आठवतात. पानांचे विविध प्रकारही आठवतात, पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे पान थोडं वेगळं आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 07 एप्रिल: आपल्या देशात विड्याच्या पानाचे (Paan) शौकिन खूप आहेत. अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक संदर्भ या पान खाण्याशी जोडलेले आहेत. पान खाणे आरोग्यासाठी लाभदायी असल्याचं आयुर्वेदातही नमुद आहे. पान म्हटलं की ‘पान खाए सैंया हमारो’, ‘खाई के पान बनारसवाला’ ही हिंदी चित्रपटांतील गाणी हटकून आठवतात. पानांचे बनारसी, मघई, कलकत्ता, मीठा, बगैर सुपारी, साधा, मसाला, गुलकंद आणि तंबाखू टाकून असे अनेक प्रकार मिळतात. आजकाल पानांमध्येही चॉकलेट, बटरस्कॉच, सुकामेवा असे अनेक प्रकार आले असून पानाच्या टपऱ्या जाऊन पानाची भव्य दुकाने आली आहेत. तिथं असंख्य प्रकारची पाने मिळतात.

पान खाण्याचा शौक असलेली दर्दी मंडळी नित्यनेमाने अशा एखाद्या दुकानात जाऊन पानाचा आस्वाद घेत असतात. सध्या पान शौकिनांमध्ये चर्चा आहे ती दिल्लीतील सोन्याच्या पानाची (Gold Paan). दिल्लीतील एका दुकानात आता चक्क सोन्याचा वर्ख लावलेले पान मिळत आहे. या दुकानातील सोन्याच्या पानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

(हे वाचा-पक्ष्यांसाठी हाताऐवजी तोंडात धरले चिप्स, पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही)

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, कॅनॉट प्लेस (Connaught Place) भागात यामू पंचायत (Yamu Panchayat) नावाचे हे दुकान असून सध्या तिथल्या सोन्याच्या पानानं पान शौकीनांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या पानाचे नाव राफालो गोल्ड पान (Raffaelo Gold Paan) असे आहे. एक महिला हे खास पान बनवत असताना या व्हिडिओत दिसते. यामध्ये ती पानावर चुना, चटणी, खुशबू हे सगळे पदार्थ घालत आहे. हे सगळे पदार्थ फक्त चावीसाठीच नाहीत तर घशाचे आरोग्य वाढवण्यासाठीही उपयुक्त आहेत, असं ती सांगते. त्यानंतर या पानात सुकामेवा, किसलेले खोबरे, बडीशेप आणि गुलकंद घातला जातो. त्यानंतर Raffaelo हे चॉकलेट घातले जाते मग पान व्यवस्थित गुंडाळून त्यावर अस्सल सोन्याचा वर्ख लावला जातो. चेरी आणि Raffaelo लावून सजवून ते ग्राहकांना दिले जाते. या पानाची किंमत तब्बल 600 रुपये असून, हे सोन्याचे पान खायला इथं शौकिनांची गर्दी होत आहे.

सोशल मीडियावर या खायच्या पानाच्या चर्चेचं पान चांगलेच रंगले असून त्यावर वेगवगेळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पान शौकीनांनी या आगळ्या वेगळ्या पानाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी याच्या किंमतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी घातल्या नसल्याचे म्हटलं आहे. उत्तम दर्जाचे पान 100 ते 150 रुपयात मिळत असताना लोक 600 रुपये खर्च करतील, अशीही प्रतिक्रिया एकानं व्यक्त केली आहे.

(हे वाचा-लुटूलुटू चालणाऱ्या पेंग्विनला कधी उडताना पाहिलंय का? पाहा हा दुर्मिळ VIDEO)

लवकरच सगळीकडे पानाचा हा नवीन प्रकार मिळू लागेल. पान दुकान चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या भल्यामोठ्या मेन्यूमध्ये आणखी एका नवीन प्रकारची भर पडेल तर पान शौकीनांच्या आस्वाद घेण्याच्या यादीत सोन्याचे पान समाविष्ट होईल. नवीन प्रकारचे पान खाल्ल्याचा आनंद त्यांना घेता येईल.

First published: April 7, 2021, 8:50 AM IST

ताज्या बातम्या