सोनीपत, 29 ऑक्टोबर : गायकाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या सोनेपत जिल्ह्यातील हरियाणवी गायक सुमित गोस्वामी यांच्या घरी गाडीने आलेल्या 4 तरुणांनी अंदाधुंद गोळीबार केला. हवेत गोळीबार करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुमितच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून तरुण फरार झाले. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. परंतु पोलीस येईपर्यंत आरोपी पळून गेले होते. घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
हे वाचा-भारत सोडून या देशाकडून खेळणार सूर्यकुमार? क्रिकेट खेळण्यासाठी मिळाली ऑफर
गायक सुमित गोस्वामीचा धाकटा भाऊ अजित गोस्वामी यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास गावात ताऊच्या घराजवळील गल्लीतील एचआर -51 क्रमांकावरून हुंडई कार आली. त्यातून तरुणांनी उतरून 5 ते 6 वेळा गोळीबार केला. तर सुमित यांच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
गेल्या महिन्यात एका व्यवसायिकानं आत्महत्या केली होती. त्याचा आणि या घटनेचा एकमेकांशी संबंध असल्याच्या दिशेनं पोलिसांनी चक्र फिरवले आहेत. या व्यवसायिकानं सुमितवर फसवणूक केल्याचे आरोप लावले होते. त्यामुळे पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू आहे.