मुंबई, 01 फेब्रुवारी : घरात लहान मुलं असली की काहीही घडू शकतं. म्हणूनच मुलांचा सांभाळ डोळ्यांत तेल घालून करावा असं पूर्वी म्हटलं जायचं. अनेक लहान मुलांना खेळणी किंवा घरातल्या वस्तू इतरत्र फेकण्याची सवय असते. काही मुलं तर जागा मिळेल तिथे वस्तू लपवून ठेवतात आणि विचारल्यावर त्यांना ती जागा नक्की सांगताच येत नाही. अशा प्रकारे घरात किती सामान आणि कचरा जमा होऊ शकतो, याची कल्पना करता येईल असा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झालाय. यात एका महिलेनं घरात हरवलेला रिमोट शोधण्यासाठी सोफा फाडला. तेव्हा आत चक्क 13 वर्षांपासूनचं सामान असल्याचं तिच्या लक्षात आलं.
केसी नावाच्या महिलेनं टिकटॉकवर हा व्हिडिओ पोस्ट केलाय. तिचा बहुतांश वेळ मुलांचा सांभाळ करण्यातच जातो; मात्र घरातली हरवलेली वस्तू शोधण्यासाठी जेव्हा तिनं सोफ्याचे दोन भाग केले तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला.
हेही वाचा - ''कुछ दिनों में गोल्डफ्लेक सोनार की दुकान मैं मिलेगी...'' बजेटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
केसीच्या घरातल्या टीव्हीचा रिमोट हरवला होता. संपूर्ण कुटुंब तो रिमोट शोधत होतं. सोफ्यावर असलेल्या उशांच्या अभ्र्यांमध्येही त्यांनी तो शोधला; पण मिळाला नाही. त्यांना वाटलं, की रिमोट सोफ्याच्या मागे पडला असेल; पण तिथेही रिमोट नव्हता. त्या वेळी त्यांना तो सोफ्याच्या आत असावा अशी शंका आली. त्यामुळे त्यांनी सोफा फाडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सोफा फाडला, तेव्हा त्यांचा संशय खरा ठरला. हा रिमोट जादूनं तर आत गेला नाही ना असं सगळ्यांना वाटलं.
टिकटॉकवरच्या या व्हिडिओत केसी हातात चाकू घेऊन जमिनीवर बसलेली दिसतेय. हळूहळू ती सोफा फाडायला सुरुवात करते. शेवटी तिला सोफ्याच्या आत भरपूर सामान मिळतं. केसीच्या घरात हा सोफा 13 वर्षांपासून होता. त्यामुळे त्यातून 13 वर्षांपूर्वीचंही काही सामान मिळालंय. मुलांची हरवलेली खेळणी व इतरही काही वस्तू त्यात आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 3.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना केसीनं त्यासोबत एक ओळही लिहिली आहे. त्यात ती लिहिते, ‘जेव्हा आपण घरातला हरवलेला रिमोट शोधायला जातो आणि सोफ्याची शस्त्रक्रिया करावी लागते... तेही केवळ मुलांचा सांभाळ करताना 13 वर्षांत जमा झालेला कचरा शोधण्यासाठी.’
केसीनं या व्हिडिओत हा कचरा कसा जमा झाला, याचा काहीही उल्लेख केला नसला, तरी मुलांचा सांभाळ करताना 13 वर्षांत जमा झालेला कचरा असं ती सांगते. बऱ्याचदा लहान मुलांच्या सवयींमुळेच अशा प्रकारे वस्तू हरवण्याचे प्रकार घडतात.
हरवलेल्या रिमोटनं शोधून दिलं 13 वर्षांपूर्वी गहाळ झालेलं सामान; सोफ्यात सापडलं असं काही फॅमिली शॉकच झाली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Video viral