नवी दिल्ली, 24 जानेवारी : विज्ञानानं एवढी प्रगती केली आहे की, आता अगदी छोटछोट्या गोष्टींसाठीसुद्धा मशीन येऊ लागलीत. अर्थात यामुळे संबंधित कामसुद्धा कमी वेळेत व कमी श्रमात होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आता भाज्या धुण्यासाठीसुद्धा मशीन आलंय. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मशीन अकरावीला शिक्षण घेणाऱ्या मुलानं बनवलं असून, त्याची दखल आयआयएम अहमदाबाद संस्थेनं सुद्धा घेतलीय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
योग्य शिक्षण, योग्य वातावरण व मार्गदर्शन मिळालं तर एखादा विद्यार्थी हा कमी वयातच स्वतःच्या मेहनतीनं त्याच्या गावाचे, राज्याचेच नव्हे तर देशाचं नाव उंचावू शकतो. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील ओनमसिंग या विद्यार्थ्यान भाजीपाला धुण्यासाठी खास मशीन तयार केलं आहे. या मशीनमुळे वेळेची बचत तर होईलच, शिवाय पाण्याचा अपव्ययही कमी होईल.
हेही वाचा - 58 वर्षांपूर्वी घेतलेलं पुस्तक परत करण्यासाठी पोहचला 76 व्या वर्षी; मात्र, झालं असं काही...
पाण्याची बचत
मिर्झापूर जिल्ह्यातील गुरुनानक इंटर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या ओनमसिंगने शेतकऱ्यांसाठी खास भाजीपाला धुण्यासाठी मशीन विकसित केलं आहे. या मशिनच्या माध्यमातून तुम्ही पाण्याची बचत करून भाजीपाला कमी वेळेत धुवू शकाल. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी ओनमचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला होता. ओनमच्या या कामाची दखल आयआयएम अहमदाबाद या संस्थेनंदेखील घेतली असून लवकरच ते त्याचा पुरस्कार देऊन सन्मान करणार आहेत. ओनम याला हे मशीन बनवण्याची प्रेरणा एका मित्राकडून मिळाली.
ओनमच्या यशानंतर त्याचे आई आणि वडील दोघेही आनंदी आहेत. त्याचे वडील व्यवसायानं इंजिनीअर असून, एका खासगी कंपनीत काम करतात. मिर्झापूर जिल्ह्यातील भरुहाना येथे भाड्यानं घर घेऊन ते पत्नी पूनम व मुलगा ओनमसोबत राहतात. ओनमची आई पूनमसिंग म्हणाली की, ‘मुलाच्या यशामुळे मला खूप आनंद झाला आहे. ओनम आधीच अभ्यासात अव्वल आहे. मुलानं अशाचप्रकारे पुढे जात राहावं.’
मशीन बनवण्यासाठी आला एक हजार रुपये खर्च
ओनम सिंग म्हणाला की, ‘एकदा शाळेत जात असताना काही लोक तलावाच्या काठावर भाजीपाला धूत होते ते मी पाहिलं. त्याचवेळी माझ्या एका मित्रानं सांगितलं की, शेतकऱ्यांना मुळा आणि इतर भाज्या धुण्यास खूप त्रास होतो. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर मी भाजीपाला धुण्याचं यंत्र बनवलं. यासाठी मला एक हजार रुपये खर्च आला. यामध्ये बादली, मोटार पंप, वायर, प्लॅस्टिकची टोपली, पाईप व नळ आदींचा वापर केलाय. हे मशीन मोठ्या स्वरुपात आणणं व त्यात काही सुधारणा करणं, यासाठी मी बीएचयूच्या कृषी शास्त्रज्ञांशी बोललो आहे.’
तर, जिल्हा विज्ञान क्लबचे समन्वयक सुशील पांडे यांनी सांगितलं की, ‘ओनमसिंगने भाजीपाला धुण्यासाठी मशीन बनवलं आहे. गावातील मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे. पण साधनांच्या कमतरतेमुळे मुलांना मदत होत नाही. मुलांच्या टॅलेंटला वाव देण्यासाठी विभागातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र बजेट अभावी त्याचा उपयोग होत नाही.’
दरम्यान, ओनमसिंगने बनवलेल्या मशीनची जोरदार चर्चा आहे. अकरावीच्या मुलानं शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या या मशीनमध्ये आणखी सुधारणा झाल्यास, त्याचा नक्कीच अनेक शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Viral, Viral news