मुंबई, 31 जुलै : प्रेम म्हणजे फक्त दोन शब्द नव्हे किंबहुना ते शब्दात मांडण्यासारखं नसतंच. प्रेम ना रंग पाहत, ना रूप, ना जात, ना धर्म. प्रेम हे अत्यंत स्वच्छंद असं असतं. प्रेम कधी, कुठे, कुणावर होईल सांगू शकत नाही. फक्त माणसंच नाही तर प्राण्यांच्या बाबतीतही हेच लागू होतं. अशाच प्राण्यांच्या प्रेमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका हत्तीने गेंड्याला मिठी (elephants rhino hug) मारली आहे.
हत्ती आणि गेंडा शरीराने मोठे असले तरी दोघेही वेगळे प्राणी. मात्र तरी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्यातील वेगळेपण आपल्यासाठीही क्षणभर बाजूला राहतो आणि आपल्याला दिसतं ते फक्त त्यांच्यातील खरं प्रेम. आयएफएस ऑफिसर सुशंता नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हत्ती आणि गेंड्याची ही गोड अशी मिठी पाहून अनेकांना मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील जादू की झप्पी आठवली आहे.
व्हिडीओत आपण पाहू शकतो. नदीजवळ पाणी पित असलेल्या या गेंड्याजवळ हत्ती येतो आणि त्याच्या पाठीवर आपली सोंड टाकतो. सोंडेने त्याला गोंजारतो, कुरवाळतो आणि गेंडादेखील जणू काही आपण आपल्या आईच्याच कुशीत आहोत असा बिनधास्त आणि शांत आहे. अगदी काळजाला हात घालणारा असा हा व्हिडीओ. हा व्हिडीओ पाहताच प्रत्येकाने लाइक केला आहे. कित्येक युझर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
म्हणतात ना प्रेमाला उपमा नाही, हेच प्रत्यक्षात दाखवणारा हा व्हिडीओ आहे. प्रेम ही व्यक्त करण्याची भावना. कोण कुणावर किती प्रेम करतं हे मोजून सांगता येत नाही तर ते कृतीतून दिसून येतं. प्रेम म्हणजे फक्त मानवी भावना नाही तर मुक्या जीवांमध्येही ही भावना असते. जरी त्यांना आपलं प्रेम किती आहे हे सांगता येत नसलं तरी आपल्या कृतीतून ते व्यक्त करून दाखवतात. माणसं माणसांवर प्रेम व्यक्त करताना आपण पाहतच आलो आहोत. असंच प्रेम प्राणीदेखील एकमेकांप्रती दाखवतात. बरं प्राण्यांचं प्रेम हे फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं तर इतर आपल्या जातीचा नसणाऱ्या आपल्यासारख्या न दिसणाऱ्या इतर प्राण्यांवरही ते प्रेम करतात.
याआधीदेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये चिंपाझीने सिंहाच्या बछड्याला दूध पाजलं होतं. फक्त दूधच पाजलं नाही तर दूध पाजता पाजता त्याच्या डोक्यावर मायेनं चुंबनही घेतलं. या व्हिडीओमधील चिंपाजीचं बछड्याप्रती प्रेम पाहून अनेक युझर्सचे डोळे पाणावले.