मुंबई, 10 सप्टेंबर : वाहतुकीचे नियम मोडले तर पोलिस दंड वसूल करतात. वाहनाशी संबंधित कागदपत्रं जवळ न बाळगल्याने अनेकदा कारवाई झालेलीही आपण पाहिली असेल; पण केरळमध्ये वाहतूक पोलिसांच्या पथकाने (Traffic Police Team ) केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल (Troll) केलं जातंय. कारण पोल्युशन अंडर कंट्रोल (Pollution Under Control) सर्टिफिकेट नसल्याचं चलन इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Electric Scooter) चालकाच्या नावे वाहतूक पोलिसांनी तयार केलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटर आणि त्या चलनाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
इलेक्ट्रिक वाहनं प्रदूषण करत नसल्याने त्यांना PUC सर्टिफिकेट लागतच नाही. पोलिसांनी मात्र यावर वेगळंच स्पष्टीकरण दिलं आहे. चलन तयार करताना चुकून वेगळाच गुन्हा निवडला गेल्याने असं झाल्याचा दावा त्यांनी केलाय. हा प्रकार गेल्या आठवड्यात केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात घडला. करुवरकुंडू पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या नीलांचेरी येथे वाहनं अडवून त्यांची तपासणी केली जात होती. वाहतुकीचे नियम मोडले म्हणून पोलिसांच्या टीमने इलेक्ट्रिक दुचाकी चालकाला 250 रुपयांचं चलन दिलं. पोलिस अधिकाऱ्याच्या मते, इलेक्ट्रिक स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीकडे वाहन चालवण्याचा परवाना (Driving Licence) नव्हता. स्कूटरचालकाकडे लायसेन्सची हार्ड कॉपीही नव्हती आणि सॉफ्ट कॉपीही नव्हती. म्हणून त्याला दंड आकारण्यात आला; मात्र त्यासाठी दंड करताना पोलिस अधिकाऱ्याने चलनच्या मशीनमध्ये लायसेन्स नसल्याच्या गुन्ह्याऐवजी PUC नसल्याचा गुन्हा (Offence) नमूद केला. त्यामुळे मशीनमधून चुकीचं चलन प्रिंट झालं.
इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसेन्स आवश्यक असतं का, असं विचारलं असता, अधिकाऱ्यांनी सांगितलं, की ज्या इलेक्ट्रिक दुचाकीला नोंदणी क्रमांक असतो, त्या दुचाकी चालकांकडे ड्रायव्हिंग लायसेन्स असणं आवश्यक असतं. कमी क्षमतेच्या इलेक्ट्रिक दुचाकीला नोंदणी क्रमांक नसतो आणि ती चालवण्यासाठी लायसेन्सही लागत नाही; मात्र लायसेन्स आवश्यक असताना जवळ बागळलं नसेल तर यासाठी मोठा दंड द्यावा लागतो. सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे, त्यावर 250 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचं दिसतंय.
तब्बल 8 वर्षांनी झाली आई-मुलाची भेट, VIDEO पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
दरम्यान, वाहतुकीचे नियम पाळले जात नसल्याने देशभरात अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चुकीचं चलन दिलं गेल्याने केरळचे वाहतूक पोलिस ट्रोल होत आहेत; पण त्याच वेळी वाहतूक नियम मोडले जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षाही व्यक्त होताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.