भोजपूर, 26 मे : गायीचे शेण आता केवळ शेण राहिलेले नाही. त्याची उत्पादने आता बाजारात फार लोकप्रिय होत आहेत. वास्तविक, आजकाल महिला आणि पुरुष देशभरात हुनर हार्टच्या माध्यमातून स्वत:चा व्यवसाय उभारत आहेत. जिथे त्यांना मोठ्या प्रमाणात यशही मिळताना दिसते. अशाच कौशल्यामुळे आणि भक्कम इराद्यांमुळे बिहारच्या अराह येथील गोवर्धन गो सेवा केंद्र ट्रस्टशी संबंधित शेकडो महिला आणि पुरुषही शेणापासून सजावटीच्या वस्तू बनवून समाजासमोर एक आदर्श निर्माण करत आहेत. यामध्ये घराच्या सजावटीपासून ते दैनंदिन उत्पादनांपर्यंत सर्व वस्तू तयार केल्या जात आहेत. या वस्तू सुबक असल्यामुळे त्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी देखील मिळत आहे.
हस्तकलेच्या माध्यमातून शेणाचा उत्तम वापर :
शेणापासून वस्तू तयार करण्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून बराच नफा कमावला जात आहे. प्रत्यक्षात गोवर्धन गो सेवा केंद्राशी संबंधित महिला हस्तकलेच्या माध्यमातून गायीच्या शेणापासून मोबाईल स्टँड, घड्याळ, झुंबर, पेन स्टँड, नेम प्लेट, चावीची अंगठी आणि लहान मुलांसाठी खेळणी अशा अनेक आकर्षक वस्तू बनवत आहेत. शेणापासून बनवलेल्या हस्तकलेच्या या वस्तूंची जवळच्या बाजारपेठातील दुकानांमध्ये ही चांगली विक्री होत आहे.
महिलांना मिळाला रोजगार :
शेणापासून सजावटीच्या वस्तू तयार करणाऱ्या महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, पूर्वी आम्ही केवळ घरकामा पर्यंत सीमित होतो. परंतु आता घरातली कामे केल्यानंतर आम्ही शेणापासून सुबक वस्तू बनवतो ज्यांना बाजारात देखील चांगली मागणी आहे. तसेच यातून मिळणाऱ्या पैशांमुळे आम्ही घराला देखील आर्थिक हातभार लावू शकतो.
असा होतो वापर :
महिला शेणापासून घरातील सजावटीचे साहित्य कसे तयार करतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, पूर्वी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात शेण टाकले जात होते. पण आपण आता शेणाचा वापर करून घराच्या सजावटीच्या आकर्षक वस्तू बनवत आहोत. शेणापासून वस्तू तयार करण्यासाठी प्रथम शेणाला पिठाप्रमाणे मळून ते सुकवले जाते. आणि नंतर ते यंत्राद्वारे दाबून त्याचा कडक पदार्थ बनवला जातो. मग तो पदार्थ आपल्याला जी वस्तू बनवायची आहे त्याच्या मोल्डमध्ये टाकून त्याला रंगरंगोटी केली जाते.
बाजारपेठेसह ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर ही मागणी :
शेणापासून बनवण्यात आलेल्या वस्तुंना स्थानिक बाजारातील दुकानांसह ऑनलाईन देखील मोठी मागणी आहे. गोवर्धन गो सेवा केंद्राशी संबंधित या व्यवसायात शेणापासून एका दिवसात सुमारे 500 सजावटीच्या वस्तूंचे उत्पादन तयार केले जाते. या वस्तूंच्या बाजारात वेगवेगळ्या किंमती आहेत. दुसरीकडे संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की, पूर्वी लोक १ रुपये किलो दराने देखील शेण खरेदी करत नव्हते, परंतु आता आम्ही त्यापासून वस्तू बनवतो आणि त्यातून बराच नफा देखील कमावतो. त्यामुळे शेणापासून वस्तू बनवणाऱ्या कारागिरांचे उत्पन्न देखील वाढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Viral, Viral news