नवी दिल्ली 28 नोव्हेंबर : अनेकदा आपण शरीरावर झालेल्या जखमांना गांभीर्याने घेत नाही. अशात या जखमा हळूहळू आपली डोकेदुखी ठरू लागतात आणि आपल्या शरीराला प्रचंड वेदना देतात. अनेकदा तर आपल्याला या गोष्टीची कल्पनाही येत नाही की आपल्याला जी दुखापत झाली की ती शरीराला किती नुकसान पोहोचवू शकते. ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. त्याच्या पायावर असलेल्या जखमेकडे त्याने दुर्लक्ष केलं. बऱ्याच काळानंतर त्याला समजलं की त्याच्या पायाला नेमकं काय झालं आहे. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि त्याचे पाय कापावे लागले.
क्वीन्सलँडमध्ये राहणारे 62 वर्षीय स्टीफेन क्रॅकर (Stephen Craker) एकदा काही कामानिमित्त गार्डनमध्ये गेले होते. इथेच एक व्हाईट टेल कोळी (White Tailed Spider) त्यांना चावला (Australian Man Spider Bite). मात्र आपल्याला काय झालं आहे किंवा चावलं आहे, हे त्यांनी पाहिलंच नाही. घरी परतल्यावर पायाच्या घोट्याजवळ काहीतरी सुजल्याचं जाणवलं. स्टीफनने त्यावेळी लक्ष दिले नाही. त्यांना वाटलं की इनग्रोन हेअरमुळे घोट्याला सूज आली असावी. शरीराचे केस त्वचेतून बाहेर येऊ शकत नाहीत, तेव्हा त्याला इनग्रोन केस म्हणतात.
काही दिवसांनी त्यांच्या पायात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानंतर स्टीफन लगेच डॉक्टरांकडे गेले. त्यांनी काही चाचण्या केल्या आणि नंतर त्यांना अँटीबायोटिक्स दिल्या गेल्या. 24 ऑक्टोबर रोजी त्यांचा त्रास वाढल्याने ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना औषधे दिली आणि बेड रेस्ट घेण्यास सांगितले. काही दिवस दुखत राहिल्यानंतर स्टीफनची प्रकृती अधिकच बिघडली.
कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवून त्यांना रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्या पायाला इन्फेक्शन झाल्याचे आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी डाव्या पायावर दोन शस्त्रक्रिया केल्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना नेक्रोसिस झाला होता. म्हणजेच त्यांच्या पायाचा तो भाग सडू लागला. यानंतर डॉक्टरांकडे पाय कापण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नाही. व्हाईट टेल स्पायडर सहसा विषारी नसते. मात्र ती चावल्यानंतर जखम होते. याच्यावर वेळीच उपचार न केल्यास स्टीफेनची जी अवस्था झाली तीच होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Surgery