मुंबई 06 डिसेंबर : भारतीय परंपरेमध्ये लग्न म्हटलं, की नवरी मुलगी डोक्यावर पदर घेऊन सजूनधजून लग्नाच्या मांडवात नवरदेवाची प्रतीक्षा करत थांबलेली पाहायला मिळते. नवरदेवाची ढोल-ताशांच्या गजरात घोड्यावर बसून शहरातून वरात काढली जाते. लग्नाच्या वरातीमध्ये बहुतांश ठिकाणी नवरी मुलगी सहभागी होत नाही. परंतु, सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत असताना लग्नकार्यातही त्यांना समान अधिकार मिळायला हवा, या भावनेने उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद इथल्या एका पित्याने आपल्या मुलीची लग्नाच्या एक दिवस आधी वरात काढली. विशेष म्हणजे नवरी मुलगी साडी आणि डोक्यावर पदर घेऊन या वरातीत सहभागी झाली नाही, तर नवरदेवाप्रमाणे सुटाबुटात अन् डोक्यावर फेटा बांधून रथात बसली होती. ढोल-ताशांचा गजर होत असताना नवरीने वडिलांसोबत नाचून आनंद व्यक्त केला. ‘आज तक’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
मुरादाबाद शहरातल्या रामगंगा विहारमधल्या हिमगिरी कॉलनीतले रहिवासी राजेश शर्मा हे अखिल भारतीय ब्राह्मण महासभेचे प्रदेश महामंत्री आहेत. त्यांच्या मुलीचा लग्नसोहळा बुधवारी (7 डिसेंबर) आयोजित केला आहे. पुरुषांप्रमाणे महिलांनाही समान अधिकार असल्याची भावना ठेवून मुलगी श्वेताला घोड्यावर बसवून तिची लग्नाची वरात काढण्याची राजेश यांची इच्छा होती. त्यामुळे हे अनोखं आयोजन करण्यात आले होते. भारतीय परंपरेत ज्या पद्धतीने नवरदेव सूट-बूट घालून वरातीत सहभागी होतो आणि नंतर मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतो, त्याचप्रमाणे श्वेताची लग्नाच्या एक दिवस आधी वरात काढण्यात आली. कुटुंबीयांसोबत मंदिरात जाऊन तिने देवदर्शनही घेतले.
हेही वाचा - चुकून जेवणाचा डबा सांडला अन् शाळकरी मुलानं केली मेट्रोची सफाई
मुरादाबादच्या हिमगिरी कॉलनी लग्नाच्या वरातीचा आवाज आला तेव्हा अनेक जण घराबाहेर येऊन पाहत होते. रथामध्ये नवरदेवाऐवजी नवरी मुलगी आणि तिचे वडील बसलेले होते. वरातीतलं हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. वरात रस्त्यावरून जसजशी पुढे जात होती, तसतसे अनेक जण सोबत चालून रथातल्या नवरीचा फोटो टिपत होते. रथामध्ये बसलेली वधू व तिच्या पित्यानेही वरातीचा मनसोक्त आनंद घेतला.
मुलीच्या लग्नाची वरात काढून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारे श्वेताचे वडील राजेश शर्मा म्हणाले, की 'मुलगा आणि मुलींमध्ये भेदभावाची मानसिकता ठेवणाऱ्यांना एक उत्तम संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. कुटुंबामध्ये मुलगा जन्मतो तेव्हा आनंद साजरा केला जातो. मुलगी जन्माला आली तर अनेक ठिकाणी दुःख व्यक्त केलं जातं. 27 वर्षांपूर्वी मीही आनंद साजरा केला नव्हता. झालेली चूक माझ्या आता लक्षात आली आहे. त्यामुळे 27 वर्षांनंतर मी आज मुलीची वरात काढून माझी हौस पूर्ण करण्यासह आनंद साजरा करत आहे. समाजात मुलींनाही मुलांप्रमाणे समान अधिकार मिळायला हवेत, हिच भावना मनात ठेवून मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने मी हा छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या प्रयत्नाने समाजाला निश्चितच प्रेरणा मिळेल याचा मला विश्वास वाटतो. समाजात सर्वांनीच मुलाप्रमाणे मुलींना समान अधिकार द्यायला हवेत या मताचा मी आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Photo viral, Video, Videos viral