कोलंबिया, 09 नोव्हेंबर : नदीचं पाणी निळशार किंवा खाली जमिनीचा रंग असतो त्यासारखं दिसतं. पण पाण्याला रंग कोणता हा प्रश्न कधी कुणी विचारला तर? पाण्याला रंगच नसतो का? असा प्रश्न पडतो त्यावेळी निसर्गाची ही अद्भूत किमया आपल्याला पाहायला मिळते. एकाच नदीमध्ये 5 वेगवेगळे रंग आणि खळखळणारं पाणी. एकही रंग एकमेकांमध्ये न मिसळता वेगवेगळ्या टप्प्यात बदलत जाणाऱ्या या रंगसंगती पाहताना आश्चर्यचकीत व्हायला होतं.
सोशल मीडियावर IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी या व्हिडीओ रिट्वीट केला आहे. नदीमध्ये असे रंग दिसण्यामागे वैज्ञानिक कारण असल्याचं सांगितलं जातं. या नदीचं पाणी इतकं शुद्ध आणि स्वच्छ आहे की या नदीच्या तळाला आलेलं पाण्यातील वनस्पती, शेवाळ किंवा दगडांचे हे रंग असल्याचं सांगितलं जात आहे. सूर्यप्रकाशात हे चमकत असल्यानं वेगवेगळ्या रंगांनी ही नदी न्हाऊन निघाली आहे. काहींनी याला पंचरंगी नदी तर काहींनी इंद्रधनुष्याची उपमा देखील दिली.
Caño Cristales is a Colombian river commonly called the "River of Five Colors"
The water is crystal clear due to lack of nutrients and particles, the colours are produced by aquatic plants on the river bed which are called Macarenia clavigera. pic.twitter.com/sbhHZLpP2o
आतापर्यंत हा व्हिडीओ साडेचार हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. 204 हून अधिक लोकांनी आतापर्यंत या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. आपल्याकडे पाण्यात बऱ्याचदा माती, धूळ किंवा रसायन मिसळलेली असतात त्यामुळे पाण्याचा रंग बदलेला किंवा वेगळा दिसतो. पण हे पाणी इतकं शुद्ध आहे की नदीच्या तळाला असलेल्या प्रत्येक गोष्टीचा रंग या पाण्यावर दिसतो आहे. अनेक मीटरपर्यंत ही अशी नदी खळखळ वाहताना पाहायला मिळते.
हा व्हिडीओ कोलंबियातील असल्याचं सांगितलं जात आहे. तर कोलंबिया देश अशा गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध असल्याचा दावा व्हिडीओ शेअर करणाऱ्या युझर्सनं म्हटला आहे. निसर्गाची ही अद्भूत किमया सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोकांनी या व्हिडीओला तुफान पसंती दिली आहे.