मुंबई, 3 डिसेंबर : जगभरात 'चहा' या पेयाचे अनेक चाहते आहे. छोट्या-छोट्या कारणांसाठी, कामाला सुरुवात करण्यापूर्वी, काम झाल्यानंतर, तब्येत बिघडली किंवा हवामान बदललं तरी हमखास चहा पिण्याची इच्छा होते. जगभरात अनेक फ्लेवर्सचा चहा उपलब्ध आहे. चहाप्रेमी या फ्लेवर्सचा आनंद घेतात. भारतीय लोकांसाठी तर चहा हे फक्त एक पेय नाही तर ती एक भावना आहे. भारतातील चहा टपऱ्या आणि दुकानांमध्ये साधारणपणे 10 ते 20 रुपयांना एक ग्लास किंवा कप चहा मिळतो. एखाद्या मोठ्या हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये गेल्यास 100 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत चहाची किंमत असते. जगातील सर्वांत महागडा चहा कोणता असेल, तो कुठे मिळतो, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? जगातील सर्वात महागड्या चहाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. 'डा हाँग पाओ' असं या चहाचं नाव असून या एक किलो चहासाठी जवळपास 10 कोटी रुपये मोजावे लागतात. हा चहा चीनमध्ये आढळतो.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमधील फुजियान प्रांतातील वुईसान भागात डा हाँग पाओ चहाची लागवड केली जाते. ही चहाची झाडं अतिशय दुर्मिळ असून त्यांना 'मदर्स ट्री' असंही म्हणतात. चिनी लोकांच्या मते, या चहाचा इतिहास खूप जुना आहे. मिंग राजवटीपासून याची लागवड होते. मिंग राजवटीमध्ये एकदा राणीची तब्येत फार बिघडली होती. अनेक उपचार करूनही तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला हा चहा दिला. या चहानं चमत्कारीक परिणाम दाखवला आणि राणी एकदम बरी झाली. तेव्हापासून या चहाला 'जीवनदाता' देखील म्हणतात.
वाचा - उंदरांमुळे करोडपती बनण्याची संधी; सरकारने दिली अजब ऑफर
या चहाची वनस्पती अत्यंत दुर्मिळ आहे. जगात या चहाची फक्त सहा झाडं आहेत. त्यांची निगा राखण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. हा चहा प्यायल्यानं अनेक गंभीर आजारांपासून सहज सुटका मिळते, असा दावा केला जातो. यामुळेच एक किलो चहासाठी कोट्यवधी रुपयांची किंमत मिळते.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जागतिक बाजरपेठेमध्ये भारतातील चहाला सर्वाधिक दर्जेदार मानलं जातं. त्याची मागणी देखील सर्वात जास्त आहे. मात्र, सर्वात महागड्या चहाचं उत्पादन घेण्याचा मान चीनकडे आहे. जगभरातील चहाच्या एकूण सेवनापैकी 35 टक्के सेवन चीनमध्ये केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.