मुबंई, 10 डिसेंबर : एखाद्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर्स संपूर्ण प्रयत्न करतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रयत्न अपयशी ठरतात. डॉक्टरांचेही प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर काहीतरी अचानक असं घडतं की, त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. असाच काहीसा प्रकार एका मुलीसोबत घडल्याचं समोर आलं आहे. 24 वर्षीय एक मुलगी कोमातून अचानक बाहेर आली आहे.
ही घटना चीनमधील असल्याची माहिती आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 24 वर्षीय एक मुलगी कोमामध्ये गेली होती. ऑक्सिजन न पोहचल्यामुळे तिचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे ती कोमामध्ये गेली होती. या मुलीला कोमातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांकडून अनेक प्रयत्न करण्यात आले.
4 महिने कोमात असलेल्या मुलीला, रुग्णालयातील नर्सेसनी अनेक जोक्स, मजेदार किस्से ऐकवले. पण नर्सेसच्या कोणत्याच बोलण्याचा त्या मुलीवर परिणाम होत नव्हता. पण एकदा अचानक त्या मुलीच्या कानावर तैवानचा एक आर्टिस्ट जे चाऊ याच्या गाण्याचे सूर पडले आणि ती एकदम कोमातून बाहेर आली. तैवान न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील एका नर्सने सांगितलं की, मी अनेकदा जे चाऊची गाणी ऐकते. त्याचंच एक गाणं मी तिच्यासमोर लावलं. जसं तिने हे गाणं ऐकलं, ती कोमातून बाहेर आली. हा संपूर्ण प्रकार पाहून रुग्णालयातील स्टाफ हैराण होता.
जे चाऊचं 'रोजमेरी' हे गाणं त्या नर्सने लावलं होतं. 2006 मध्ये हे गाणं अतिशय सुपरहिट ठरलं होतं. हेच गाणं ऐकून त्या मुलीने डोळे उघडले आणि ती हसू लागली, असल्याचं नर्सेसकडून सांगण्यात आलं आहे.
कोमामध्ये गेलेली ही मुलगी शुद्धीवर आल्यानंतर तिला नर्सेसने सर्वात आधी तिला हात-पाय हलवण्यास सांगितलं. ती हाता-पाायची योग्य हालचाल करण्यासही यशस्वी ठरली आणि तब्बल 4 महिन्यांनंतर कोमातून बाहेर आली. इतके दिवस कोमात असेलली मुलगी कोमातून बाहेर आल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला असला, तरी केवळ एका गाण्याने अशाप्रकारे तिचं कोमातून बाहेर येणं, याबाबत सर्वांकडूनच आश्चर्य व्यक्त होत आहे. या घटनेने सर्वच जण हैराण आहेत. एका गाण्याने तिला नवं जीवन दिलं असल्याची भावना व्यक्त होत आहे.