भोपाळ, 16 जून : एक बैल घरातील थेट तिसऱ्या मजल्यावर घुसल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरातील सर्वच जण हैराण असून या बैलाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा बैल एका घरातील सर्वात वरच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचला. ज्यावेळी घरातील लोकांनी त्याला पाहिलं, सर्वच थक्क झाले होते. बैल घरातील तिसऱ्या मजल्यावरील खोलीत बेडवर आरामात बसला होता.
ही घटना मध्य प्रदेशातील रीवा येथील उपरहटी मोहल्ल्यात घडली आहे. या बैलाची मोठी चर्चा आहे. घराचं दार खुलं असताना बैलाने घरात प्रवेश केला. घरातील पायऱ्या चढून हा बैल थेट तीन मजली असलेल्या घरातील सर्वात वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन बसला. कुटुंबातील लोकांनी खोलीतून विचित्र आवाज ऐकल्यानंतर, ते खोलीकडे आले, आणि समोरिल दृष्य पाहून थक्कच झाले.
थेट तिसऱ्या मजल्यावरील खोलीत बैलाला पाहून कुटुंबातील सर्वच जण घाबरले. बैल आरामात बेडवर बसला होता. त्याने खोलीतील सर्व सामानाची नासधूस केली होती. पण या बैलापुढे जाण्यासाठी मात्र कोणीही हिम्मत करू शकत नव्हतं. या घरातील आवाज ऐकून परिसरातील लोकांची मोठी गर्दी झाली होती.
बैलाने खोलीत चांगलाच गोंधळ घातला होता. अनेकांनी या बैलाचे व्हिडीओही काढले. सोबतच बैलाला तीन मजली घरातून बाहरे काढण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. अखेर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बैलाला घरातून बाहेर काढण्यात यश आलं.
या घटनेनंतर स्थानिकांनी शहरात भटक्या प्राण्यांची दहशत असल्याचंही सांगितलं. दरवाजा खुला दिसताच हे घरात प्रवेश करतात. असाच प्रकार या घराबाबत घडला आणि बैलाने थेट खोलीत घुसून सर्वांनाच हैराण केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.