मुंबई 04 फेब्रुवारी : पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहनं चालवून जीव गेल्याच्या अनेक घटना पाहायला मिळतात. भारतात आणि महाराष्ट्रात अशा घटना नेहमी घडत असतात. परंतु परदेशामध्ये वाहतुकीचे नियम अतिशय कडक असताना व यंत्रणांकडून कारवाई केली जात असतानाही असा प्रकार होत असेल तर ही बाब चकित करणारी आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात बसचालक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यामधून गाडी चालवत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील असल्याचं सांगितलं जात आहे.
ऑकलंड येथील स्थानिक अधिकारी डेबी बरोज यांनी फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला. यात पुराच्या पाण्यामध्ये बुडालेल्या दोन कार दिसत आहेत. पाण्यात बुडालेल्या कारचा व्हिडिओ शूट करताना एक बस ड्रायव्हर त्याची बस पुराच्या पाण्यातून काढत असल्याचंही निदर्शनास येते. पुराचे पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं होतं की, कारच्या छतापर्यंत ते पाणी पोहोचलं आहे.
इतकी गंभीर स्थिती असताना प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बस ड्रायव्हरच्या व्हिडिओ पाहून नेटिझन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. ऑकलंड कौन्सिलच्या 21 स्थानिक बोर्डांपैकी एक असलेल्या माँगाकीकी तमाकी स्थानिक बोर्डाच्या डेप्युटी चेअरपर्सन डेबी बरोज यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करून गंभीर प्रकार समोर आणला आहे.
अपघात होऊ नये म्हणून आपत्कालीन सेवेशी साधला संपर्क
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुराचं पाणी प्रचंड वाढलेलं दिसत आहे. या पाण्यात काही वाहने अडकून पडली होती. पुराचे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा न करता बसचालक त्याची बस पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने पुराच्या पाण्यात ती बस न अडकता हळूहळू पुढे मार्गक्रमण करते.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला एका महिलेचा आवाज येतो. यात ती म्हणते की, पुराचं पाणी इतकं वाढलेलं असताना मोठं वाहन या पाण्यातून जाणं हा प्रकार गंभीर आहे. हे दृश्य पाहून बिलकुल ही विश्वास बसत नसल्याचे ती सांगते. व्हिडिओ पाहून कदाचित आपण थट्टा-मस्करी करत आहोत की काय? असं तुम्हाला वाटू शकतं.
परंतु, खरोखर हा बसचालक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बस चालवत असल्याचे ती महिला म्हणते. बरोज यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिलं आहे. पुराच्या पाण्यात आणखी वाहनं अडकू नयेत आणि अपघात होऊ नये म्हणून या वेळी 111 या आपत्कालीन नंबरवर फोन करून माहिती देण्यात आल्याचे व्हिडिओत सांगितलं जातं. एकूणातच बसमधील प्रवाश्यांच्या जीवाची जबाबदारी ड्रायव्हरवर असते त्याने असं करणं चुकीचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Social media, Social media trends, Top trending, Viral