मराठी बातम्या /बातम्या /Viral /

सोशल मीडियावर 'I Miss U' म्हणताच पोलिसांनी तरुणाला डांबलं तुरुंगात; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

सोशल मीडियावर 'I Miss U' म्हणताच पोलिसांनी तरुणाला डांबलं तुरुंगात; नेमकं काय आहे प्रकरण वाचा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

सोशल मीडियावर आय मिस यू म्हणणाऱ्या तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी त्याला अटकही केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 05 ऑक्टोबर : सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं सोपं माध्यम. कित्येक जण आपलं आनंद, दुःख इथं व्यक्त करतात. एखाद्याची आठवण आली की आय मिस यू हे वाक्य सोशल मीडियावर पोस्ट केलं जातं. तुम्हीसुद्धा अशी पोस्ट कधी ना कधी केली असेल. पण हीच पोस्ट एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. आय मिस यू अशी पोस्ट व्हायरल करताच या तरुणाला अटक झाली आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून तुरुंगात डांबलं आहे. उत्तर प्रदेशमधील हे हैराण करणारं प्रकरण आहे.

आय मिस यू जान, हे वाक्य तसं आक्षेपार्ह नाही. पण तरी यूपीच्या पीलीभीतमधील एक दाम्पत्य ही पोस्ट पाहिल्यानंतर तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलं. त्यांनी त्यांच्याच गावात राहणाऱ्या त्यांच्यात नात्यातील एका तरुणाविरोधात तक्रार दिली. या तरुणाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यात त्याने आय मिस यू जान असं म्हटलं होतं. या पोस्टमध्ये दोन फोटोही होते. एक फोटो या तरुणाचा होता आणि दुसरा त्याच्या वहिनीचा म्हणजे तक्रार करायला आलेल्या महिलेचा.

हे वाचा - सोशल मीडिया वापरताना ठेवा 'या' गोष्टींंचं भान, नाहीतर बसेल मोठा भुर्दंड

तक्रारीनुसार महिलेच्या नवऱ्याने सांगितलं की त्याच्या भावाने फेसबुकवरून त्याच्या पत्नीचा फोटो घेतला आणि स्वतःच्या फोटोसोबत जोडून इन्स्टाग्राम, फेसबुकवर व्हायरल केला. फोटोत आपत्तीजनक भाषेचाही वापर केला. मी हनुमान दलाचा जिल्हा मीडिया प्रभारी आहे. त्यामुळे माझ्यासह माझी पत्नीसुद्धा तरुणाच्या या कृत्यामुळे रागावली आहे.

तरुणाचा भाऊ आणि वहिनी पोलीस ठाण्यात गेले. महिला पोलिसांसमोर ढसाढसा रडू लागली. तिने आपल्या दिराविरोधात तक्रार देताच पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई केली. आज तकच्या वृत्तानुसार पोलिसांनी तरुणाला अटक करून त्याला जेलमध्ये टाकलं. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र होते आहे.

सोशल मीडिया वापरताना सावधान!

घटनेच्या कलम 19 (1) (A) नुसार सर्व नागरिकांना आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जण त्या स्वातंत्र्याचा उपभोगही घेत आहेत; मात्र या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या कायद्यांचं उल्लंघन होता कामा नये, असा दंडक आहे. फेसबुक, ट्विटरसह सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर पोस्ट करताना या नियमांचं भान असणं गरजेचं आहे. कोणाच्या भावना दुखावणारा, दोन समुदायांमध्ये भांडणं लावणारा, माथी भडकावणारा मजकूर कोणत्याही स्वरूपात पोस्ट केला जाऊ नये, असं नियम सांगतो.

हे वाचा - Facebook वापरताना 'या' चूका पडतील महागात, तुम्हाला देखील अशा सवयी असतील, तर त्या आताच बदला

नियमबाह्य मजकूर सोशल मीडियावर पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000नुसार (IT Act) दोषी ठरवलं जातं. त्यात सोशल मीडिया युझर्स, सोशल मीडिया कंटेंट प्रोव्हायडर, नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर्स आदींचाही समावेश असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास आयटी कायद्याच्या कलम 67नुसार कारवाई केली जाते. भारतीय आयटी कायद्यानुसार सायबर क्राइमसाठी (Cyber Crime) 3 वर्षांपासून आजीवन कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते. तसंच एक लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो, अशी तरतूद आहे.

First published:

Tags: Social media, Uttar pradesh, Viral, Viral news