नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) योगाला किती महत्त्व देतात हे सर्वांनाच माहिती आहे. ते स्वत: नियमित योगा (yoga) करतात. आता त्यांच्या नावानं असाच एक योगा व्हिडीओ (modi yoga video) सोशल मीडियावर व्हायरल (social media viral video) होतो आहे. जो मोदींचा दुर्मिळ असा योगा व्हिडीओ (yoga video) असल्याचा दावा केला जातो आहे. हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज गोएल (bjp leader manoj goel) यांनी शेअर केला आहे. जेव्हा या व्हिडिओची पडताळणी केली गेली तेव्हा हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींचा दुर्मिळ योगा व्हिडीओ असल्याचा दावा खोटा ठरला आहे.
भाजप नेते मनोज गोयल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये एक व्यक्ती योगा करताना दिसत आहे. हे योगासन खूप कठीण असं आहे. ही व्यक्ती म्हणजे पंतप्रधान मोदी असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. 'योगऋषी पंतप्रधान मोदी यांचं योगी रूप', असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
गोएल यांनी केलेला हा दावा कितपत तथ्य आहे, याबाबत पडताळणी करण्यात आली. त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडीओ पाहून बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये दिसणारे हे योगी पीएम मोदी नसून महान योगगुरू दिवंगत बीकेएस अय्यंगार (BKS Iyengar) आहेत, हे स्पष्ट झालं.
हा व्हिडिओ 1938 मध्ये शूट करण्यात आला होता आणि 2006 मध्ये तो युट्यूबवर अपलोड करण्यात आला. पीएम मोदी यांचा जन्म 1950 मध्ये झाला होता. युट्यूबवर सापडलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शननुसार, ही फिल्म 1938 मध्ये मॅकपॅट्रक यांनी बनवली होती. या व्हिडिओमध्ये अय्यंगार योगा करताना दिसत आहेत.
अय्यंगार यांना 'अय्यंगार स्टाईल' योगाचे संस्थापक मानले जाते. जगातील सर्वात मोठ्या योगा शिक्षकांमध्ये त्यांची गणना केली जाते. अय्यंगार यांनी तिरुमलई कृष्णामाचार्यांकडून योगाचं प्रशिक्षण घेतलं होतं. कृष्णामाचार्य हे आधुनिक योगाचे जनकदेखील मानले जातात. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये त्यांच्या योगाच्या पद्धतीचं वर्णन हठयोगाचा एक प्रकार म्हणून केलं गेलं आहे. या संपूर्ण व्हिडिओमध्ये अय्यंगार यांचे शिक्षक कृष्णामाचार्यसुद्धा आहेत, मात्र व्हिडिओचा तो भाग काढून टाकण्यात आला आहे.