मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पाच वर्षे अंडी विकण्याचं काम करत चांभाराचा मुलगा झाला प्रशासकीय अधिकारी; बिहारच्या विरेंद्र कुमारची अनोखी यशोगाथा

पाच वर्षे अंडी विकण्याचं काम करत चांभाराचा मुलगा झाला प्रशासकीय अधिकारी; बिहारच्या विरेंद्र कुमारची अनोखी यशोगाथा

बिहारच्या (Bihar) विरेंद्र कुमारची (Birendra Kumar) प्रेरणादायी कहाणी  नक्की वाचा.

बिहारच्या (Bihar) विरेंद्र कुमारची (Birendra Kumar) प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा.

बिहारच्या (Bihar) विरेंद्र कुमारची (Birendra Kumar) प्रेरणादायी कहाणी नक्की वाचा.

बिहार, 09 जून: घरात सगळ्या सुखसोयी, प्रेम करणारे आई-वडील इतर कुटुंबीय, आर्थिक संपन्नता असूनही अनेक मुलं शिक्षण घेण्यासाठी उत्सुक नसतात. मौजमजा करण्यात त्यांना अधिक रस असतो. अशावेळी राहायला धड घर नाही, दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत तर कधी आई-वडिलांचे छत्रही नाही अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीनं, चिकाटीनं आपलं ध्येय साध्य करणारी मुलं अनेकांना केवळ प्रेरणाच (Inspiration) नाही तर नवी ऊर्जा देतात. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे बिहारच्या (Bihar) विरेंद्र कुमारची (Birendra Kumar).

टीव्ही 9 हिंदी डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या 64 व्या बिहार लोकसेवा आयोगाच्या (Bihar Public Service Commission-BPSC) परीक्षेत विरेंद्र कुमार यशस्वी झाला असून त्यानं या परीक्षेत 2232 वा क्रमांक मिळवला आहे. त्याची ब्लॉक सप्लाय अधिकारी (Block Supply Officer) म्हणून नेमणूक झाली आहे. अत्यंत कठीण अशी ही परीक्षा त्यानं अत्यंत बिकट परिस्थितीशी तोंड देत यशस्वीरीत्या पार केली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. फार थोडे विद्यार्थी यात यश मिळवतात. या मोजक्या लोकांमध्ये विरेंद्र कुमारचा समावेश आहे. त्याची कहाणी ऐकली तर त्याचं यश किती मोठं आहे याची जाणीव होईल. पिढीजात चपला, बूट दुरुस्तीचा धंदा असणाऱ्या एका गरीब घरातील या मुलानं स्वतः पाच वर्षे अंडी विकण्याचा धंदा (Selling Eggs) करत अभ्यास सुरू ठेवला आणि आपल्या अथक प्रयत्नांच्या बळावर मानाची सरकारी नोकरी मिळवली. सरकारी नोकरी मिळवणारा विरेंद्र कुमार हा त्याच्या कुटुंबातला पहिला सदस्य आहे.

हेही वाचा- कॅमेरा पाहून तोंड लपवू लागली प्रसिद्ध अभिनेत्री; पाहा काय नेमकं काय घडलं

विरेंद्र कुमारचे वडील भिखारी राम हे चप्पल,बूट दुरुस्तीचा व्यवसाय करून आपल्या तीन मुलांसह कुटुंब चालवत होते. 2012 मध्ये त्यांचं निधन झाले. कुटुंबाची सगळी जबाबदारी विरेंद्र कुमारचा मोठा भाऊ जितेंद्रकुमार याच्यावर आली. त्यानं पारंपरिक व्यवसायासह बॅगा तयार करण्याचं काम सुरू केलं. त्याची कमाईही अपुरी ठरत होती. त्यामुळं विरेंद्र कुमारनं अंडी विकण्याचं दुकान सुरू केलं. त्याच्या मोठ्या भावाचा व्यवसाय चांगला वाढल्यावर त्यानं विरेंद्र कुमारला स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं. तोपर्यंत पाच वर्ष विरेंद्र कुमार हे दुकान चालवून उरलेल्या वेळात अभ्यास करत असे.

आपल्या या प्रवासाबद्दल सांगताना विरेंद्र कुमार म्हणाला, ‘मी गावातल्या सरकारी शाळेत शिकलो. नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील दाउदनगर महाविद्यालयातून पदवी घेतली. माझ्या डोक्यात स्पर्धा परीक्षा देण्याचा कसलाही विचार नव्हता. मी ज्यांना राजीव सर म्हणतो त्यांनी मला यासाठी प्रेरणा दिली. राजीव सरांचे मार्गदर्शन आणि इंटरनेटच्या सहायाने अभ्यास करत या परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेतले आणि पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झालो.’

अशी परीक्षा देणं वाटत होतं अशक्य :

माझी कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामान्य शिक्षण यामुळे मला बीपीएससीची परीक्षा (BPSC Exam) देणं माझ्या आवाक्याबाहेरचे आहे असंच वाटत होतं. पण एकदा परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मी माझ्यातल्या कमतरता दूर करण्यावर लक्ष केंद्रित केलं. लाखो उमेदवारांमधील कोणते गुण मला वेगळं ठरवतील याचा मी विचार करत असे. न कंटाळता न थकता मी अभ्यास करत राहिलो आणि अखेर हे यश माझ्या पदरात पडलं, असं विरेंद्र कुमार म्हणाला.

त्याची आई त्याचं हे यश बघण्यासाठी जिवंत नाही याचं त्याला दुःख आहे. जानेवारीत त्याच्या आईचं निधन झालं. त्याच्या यशात त्याच्या आईचा मोठा वाटा होता. तिनं नेहमीच त्याला प्रेरणा दिली आणि तो हे करू शकतो असा विश्वास कायम त्याच्या मनात ठेवला. आईची प्रेरणा, भावाचे पाठबळ आणि स्वतःची जिद्द याच्या जोरावर अवघड परीक्षा पहिल्या फटक्यात उत्तीर्ण होऊन मानाची सरकारी नोकरी मिळवणाऱ्या विरेंद्र कुमारची कामगिरी नक्कीच अत्यंत कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.

First published:

Tags: Bihar