अंबरनाथ, 15 जानेवारी : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये भर दुपारी दीड वाजता ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घातला जात होता. पण दोन-तीन तरुणांनी धाडसीपणे या सशस्र लुटारूंचा सामना करून त्यांना पळवून लावलं. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तीन तरुणांनी बंदुकधारी चोरट्यांशी झुंजताना दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वासनसिंह (26), लक्ष्मणसिंह (30) हे बंधू आणि भैरवसिंह (25) अशी या तीन तरुणांची नावं आहेत. ते तिघंही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अंबरनाथमधील सर्वोदयनगरमध्ये हा प्रकार घडला. सीसीटीव्हीमध्ये, धनलक्ष्मी ज्वेलर्स या दुकानाच्या बाजूने एक काळा टी शर्ट घातलेला तरुण येताना दिसतो आहे. तो चपला बाहेर काढून, दुकानात प्रवेश करतानाच आतून एक व्यक्ती त्याची मान पकडून त्याला आता खेचण्याचा प्रयत्न करते. तो त्याला जोरदार प्रतिकार करून मागे सरकतो. हा प्रकार पाहून दुकानासमोरून एक तरुण त्याच्या मदतीला धावतो. तेवढ्यात दार उघडून आतले दरोडेखोर बाहेर येतात. त्यापैकी एकाच्या हातात बंदुक दिसते. तो बाहेरून आलेला तरूण बेधडकपणे बंदुक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो.
आतून आलेले दरोडेखोर आणि हे तीन तरूण यांच्यात रस्त्यावर झटापटी होते. त्यात मदतीला आलेल्या तरुणाला पायाला इजा होते, तरीही तो उठून प्रतिकार करतो. तरुणांनी दाखवलेल्या या धाडसामुळे दरोडेखोर अखेर पळून जातात. एखाद्या चित्रपटासारखा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दरोडेखोरांकडे बंदुका, चाकू, चॉपर अशी हत्यारं होती. दुकानदारांनी अलार्म वाजवल्यावर दरोडेखोराने गोळीही झाडली. त्यात लक्ष्मण जखमी झाला. दरोडेखोर शिरले तेव्हा भैरवसिंह दुकानात एकटा होता. त्यालाही त्यांनी सुऱ्याने भोकसलं. हे तिघंही गंभीर जखमी झाले असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral videos