नवी दिल्ली, 24 जानेवारी : पृथ्वीवर भरपूर पाणी आहे, असा आपला समज आहे. पण, नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याचं प्रमाण केवळ 1.2 टक्के आहे. पिण्याचं पाणी अत्यल्प प्रमाणात असल्यानं पाण्याचा पुनर्वापर करण्याची गरज निर्माण होत आहे. मॉल्स, दुकानं आणि इतर इमारतींमध्ये वापरल्या जाणार्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. काही वर्षांपूर्वी बेल्जियममधील एक रेस्टॉरंट पाण्याच्या पुनर्वापरामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलं होतं. हे रेस्टॉरंट नळाचं नाही तर टॉयलेटमधील पाण्याचा पुनर्वापर करतं.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, बेल्जियममधील कुरेन (Kuurne) येथे गुस्टो (Gusteaux) नावाचं एक रेस्टॉरंट आहे. येथे ग्राहकांना दिलं जाणारं पाणी अगदी सामान्य पाण्यासारखं आहे. सामान्य पाण्याप्रमाणेच त्याला चव किंवा रंग नाही. तरीदेखील हे पाणी सामान्य पाण्यापेक्षा वेगळं आहे. कारण, हे रेस्टॉरंटच्या टॉयलेटमधून जमा केलेलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये टॉयलेटमधील पाणी जमा करून ते रिसायकल केलं जातं.
हेही वाचा - भारतीय लग्नात फॉरेनर बॅंडवाले; Video चा इंटरनेटवर धुमाकूळ
टॉयलेटमधील पाण्याचा होतो पुनर्वापर
हे रेस्टॉरंट टॉयलेटमधून गोळा केलेलं पाणी इतकं स्वच्छ बनवतं की, ते ग्राहकांना देण्यायोग्य बनतं. हे बेल्जियन रेस्टॉरंट सीवर सिस्टमला जोडलेलं नाही. अशा परिस्थितीत टॉयलेट आणि वॉश बेसिनमधून बाहेर पडणारं पाणी गोळा करून त्याचा पुनर्वापर करणं हा एकमेव पर्याय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टॉयलेट आणि सिंकचं पाणी अगोदर प्लांट फिर्टिलायझरच्या मदतीनं स्वच्छ केलं जातं. त्यानंतर काही पाणी पावसाच्या पाण्यात मिसळून बाथरूममध्ये पुरवलं जातं जेणेकरून टॉयलेट फ्लश करता येईल. उर्वरित पाणी शुद्धीकरणाच्या पाच टप्प्यांतून जातं त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य होतं.
ग्राहकांना पिण्यासाठी दिलं जातं पाणी
हे ऐकून तुम्हाला किळस येत असेल. पण, हे टॉयलेटचं पाणी इतकं स्वच्छ केलं जातं की, त्याला कोणतीही चव राहत नाही. त्यामुळे, त्यात पुन्हा मिनरल्स मिसळली जातात जेणेकरून ते पिण्यायोग्य बनते. रेस्टॉरंटमधील हे रिसायकल्ड पाणी ग्राहकांना मोफत दिलं जातं. या शिवाय त्यापासून बर्फही तयार केला जातो. हाच बर्फ कॉफी आणि इतर पदार्थांमध्ये टाकला जातो.
पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस भीषण होत चाललेली आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये पिण्याचं संकट आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा पुनर्वापर हा एकमेव चांगला पर्याय दिसत आहे. आता अनेक हॉटेल ही इकोटेल होत आहेत ज्यामध्ये नैसर्गिक कचरा, पाणी यांचा पुनर्वापर केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral news