टोकियो : जपानमध्ये पोकेमॉन व्हिडिओ गेम आणि ट्रेडिंग कार्ड्सना प्रचंड मूल्य आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्याची प्रचीती येण्यासारखी घटना टोकियोत गेल्या महिन्यात घडली. एका तरुणाने आपलं कर्ज फेडण्यासाठी चक्क पोकेमॉन कार्ड्सची (Pokemon Cards) चोरी केली. बातमीतलं खरं आश्चर्य पुढेच आहे. तो तरुण या चोरीसाठी तब्बल सहा मजले उंच असलेल्या इमारतीवर दोरखंडावरून (Climbed on Rope) चढला. अर्थात पोकेमॉन कार्ड्स मनावर जादू करत असली, तरी ती जादू पोलिसांवर चालू शकली नाही. त्यामुळे तो तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला.
मैनिची शिम्बून (Mainichi Shimbun) या जापनीज वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, केन्सुके नाकानिशी (Kensuke Nakanishi) असं त्या 28 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. टोकियोतला हा तरुण माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात कार्यरत आहे. सहा मजली इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर असलेल्या दुकानातली ट्रेडिंग कार्डस् चोरण्यासाठी तो दोरखंडाच्या साह्याने सहा मजले चढला. त्याने इमारतीच्या गच्चीवर दोरखंड बांधला आणि तिथून तो खाली सोडला. त्यावरून तो कसलाही अन्य आधार न घेता चढला. अर्थातच सुरक्षेचं काही साधनही त्याने वापरलं नाही. त्यानंतर त्याने एका साधनाच्या साह्याने दुकानाची काच फोडली आणि आत प्रवेश केला.
9120 डॉलर मूल्याची ट्रेडिंग कार्डस् आणि 2370 डॉलरची रोख रक्कम त्याने चोरली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुकानाच्या जवळ असलेल्या सिक्युरिटी कॅमेरामध्ये हा प्रकार चित्रित झाल्याने व्हिडिओ फूटेजमधून पोलिसांना त्याची माहिती मिळाली.
हायस्कूलमध्ये असताना तो रॉक क्लायंबिंग क्लबमध्ये होता. त्यामुळे त्याला उंचीची भीती वाटत नाही आणि म्हणूनच त्याने चोरीसाठी ही पद्धत वापरली, अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. हे पैसे आपण कर्ज फेडण्यासाठी वापरणार होतो, असंही त्याने पोलिसांना सांगितलं.
कोरोना विषाणूने कहर माजवलेला असताना अनेक जण स्वतःचं मन घरी रमवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करत होते. त्या वेळी पोकेमॉन कार्डस् पुन्हा लोकप्रिय झाली. गेल्या महिन्यात एक व्हिंटेज पोकेमॉन ट्रेडिंग कार्ड ई-बेवर चक्क तीन लाख 11 हजार 800 डॉलर एवढ्या प्रचंड किमतीला विकलं गेलं. PSA 10 Gem Mint असं त्याचं रेटिंग होतं. पोकेमॉन कार्ड्सच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून येऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: International, Japan