अमरावती, 30 नोव्हेंबर : अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशनसमोर एका धावत्या खासगी बसने पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रायपूरवरून सुरतकडे प्रवासी घेवून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. सुदैवाने बसमधील 52 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश मिळाल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवाशांनी बाहेर पडताच सुटकेचा श्वास घेतला.
सोमवारी पहाटे 2 वाजताचे सुमारास तिवसा स्टेशनसमोर ही घटना घडली. रात्री 2 वाजेच्या सुमारास महेंद्र ट्रॅव्हल्सची ही बस रायपूरवरून प्रवाशी घेवून नागपूर,अमरावती मार्गे सुरतकडे जात होती. दरम्यान, नागपूर ते अमरावती हायवेवरील तिवसा पोलीस स्टेशन समोर अचानक या ट्रॅव्हल्सने पेट घेतला.
बसमधील सर्व प्रवाशी गाढ झोपेत असतांना अचानक बसमध्ये धुवा निर्माण झाल्याने ट्रॅव्हल्स पेटल्याचे समजताच बसमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. तेव्हा तात्काळ तिवसा पोलीस स्टेशनचे कर्मचारी निलेश खंडारे हे मदतीला धावून आले आणि त्यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. सर्व प्रवाशांना वेळीच सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ट्रॅव्हल्सच्या कंडक्टर साईटचा मागील टायर फुटल्याने धावत्या ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याचे समजते. सुदैवाने तिवसा पोलीस स्टेशनला अग्निशमन दलाची गाडी तयार होती. त्या आधारे चार गाड्या पाणी ओतून बसला लागलेली आग विझवण्यात यश आले. घटनास्थळावर तिवसा युवक काँग्रेस कार्यकर्तेही मदतीला धावून आले होते.