कोलकाता 01 एप्रिल : चोरीचं एक अतिशय अजब प्रकरण समोर आलं आहे. यात पूर्व मिदनापूरमध्ये एका उंदराने किराणा दुकानाच्या कॅश ड्रॉवरमधून 13,000 रुपये चोरले. उंदराने चलनी नोटा कॅश ड्रॉवरमधील एका गॅपमधून आत जात कुरतडल्या आणि त्या आपल्या घरात ठेवल्या. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यामुळे नशीबवान मालकाला यातील 12,700 रुपये उंदराच्या बिळातून बाहेर काढण्यात यश आलं.
तमलूक मार्केटमधील दुकानाचे मालक अमल कुमार मैती यांनी बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे आपलं दुकान बंद केलं. ते म्हणाले, की “दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास मी माझ्या दुकानात आलो आणि तेव्हा समजलं की कॅश ड्रॉवरमधून काही नोटा गायब झाल्या आहेत. माझ्याकडे एक कर्मचारी आहे जो रात्री दुकानात असतो. माझा त्याच्यावर विश्वास असल्याने मला त्याच्यावर संशय आला नाही. ड्रॉवरचे कुलूप शाबूत होते आणि चावी माझ्याकडे होती.’’
मैतीने इतर व्यापाऱ्यांना हरवलेल्या रोकडची माहिती दिली. ते सगळे त्यांच्या दुकानात जमले. त्यांच्यात या विषयावर बोलणं झाले आणि शेवटी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मैती म्हणाले “पण स्थानिक पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. आम्ही असं केल्यावर आम्हाला काहीही संशयास्पद आढळलं नाही. आम्ही वैतागलो होतो. मग माझ्या एका व्यावसायिक सहकाऱ्याने मला पुन्हा एकदा फुटेजची पूर्ण तपासणी करण्यास सांगितलं’’ .
दुकानात चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. व्यापाऱ्यांनी फुटेजची कसून तपासणी सुरू केली. मैती पुढे म्हणाले, "आम्ही सीसीटीव्ही रेकॉर्डिंग पाहणं थांबवणार होतो इतक्यात अचानक एका व्यापाऱ्याने मला एका कॅमेऱ्यातील फुटेज थांबवून रिवाइंड करायला सांगितलं. ते पुन्हा पाहत असताना आम्ही सर्वजण हैराण झालो. सकाळी ७ वाजताच्या सुमारास एक उंदीर ड्रावरमधून पैसे काढताना दिसला आणि एका बिळात जाऊन तो दिसायचा बंद झाला. थोड्याच वेळात तो पुन्हा बाहेर आला आणि कॅश ड्रॉवरमध्ये गेला. तो चलनी नोटा, कधी एक तर कधी अनेक असं करून घेऊन जात होता. हे पैसे तो उंदीर राहात असलेल्या बिळात घेऊन जात होता"
मग मैती आणि इतरांनी आतमध्ये उंदराचं बिळ शोधून खोदण्यास सुरुवात केली. "आम्ही या छिद्रातून 12,700 रुपये बाहेर काढले. मात्र 300 रुपये अद्याप गायब आहेत. अशी घटना घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती," असे मैती म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Theft, Viral news