नवी दिल्ली, 21 जानेवारी : तमिळनाडू येथील दिंडीगूल जिल्ह्यातील उल्गामपट्टायरकोट्टम येथील थडीकोम्ब पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 62 वर्षीय व्यक्तीची शेजाऱ्यानं मारहाण करून हत्या केली. रायप्पन असे मृत व्यक्तीचं नाव आहे. रायप्पन यांनी केवळ शेजाऱ्याच्या पाळीव श्वानाला कुत्रा म्हटलं होतं. त्यावरून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी (19 जानेवारी 2023) घडली आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
अनेकजणांचं त्यांच्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असतं. आपल्या देशात श्वानप्रेमींची संख्याही मोठी आहे. अनेकजण स्वतःच्या पाळीव प्राण्यावर इतकं प्रेम करतात की, ते त्याच्यासाठी काहीही करू शकतात. पण तमिळनाडू राज्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका व्यक्तीनं पाळीव श्वानाचं नाव न घेता त्याला कुत्रा म्हटल्यामुळे श्वानाच्या मालकानं त्याची हत्या केली. उल्गामपट्टायरकोट्टमच्या थडीकोम्बू पोलीस ठाण्यांतर्गत ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी निर्मला फातिमा राणी, तिचा मुलगा डॅनियल व व्हिन्सेंट यांना अटक केली आहे.
हेही वाचा - Video : जवळ घेत तलावातील मगरीला खाऊ घातलं मांस, पुढे जे घडलं ते पाहून म्हणाल, हिंमत असावी तर अशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला फातिमा राणी आणि तिची मुले डॅनियल आणि व्हिन्सेंट यांनी एक कुत्रा पाळला होता. या कुत्र्याचे नावही ठेवलं होते. कुत्र्याला त्याचे नाव न घेता केवळ कुत्रा म्हणून हाक मारली तर त्याचा फातिमा राणी आणि तिच्या मुलांना राग येत होता. त्यांनी तर शेजाऱ्यांना अनेकदा ताकीद दिली की, त्यांच्या पाळीव श्वानाला कुत्रा म्हणू नका, तर त्याला नावानं हाका मारा. पण त्यानंतरही रायप्पन यांनी कुत्र्याला कुत्रा म्हंटल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
निर्मला फातिमा राणी यांच्या शेजारी राहणारे रायप्पन (वय 62) गुरुवारी त्यांच्या नातवासोबत त्यांच्या शेतावर होते. रायप्पन यांनी त्यांचा नातू कॅल्विनला शेतात सुरू असणारी पाण्याची मोटार बंद करण्यास सांगितलं. तसेच जाताना एक काठी सोबत घेऊन जा, तेथे कुत्रा आहे, असेही रायप्पन त्याला म्हणाले. त्यावेळी तेथे डॅनियलसुद्धा होता. डॅनियलने रायप्पनचे बोलणं ऐकलं, आणि त्यानं, ‘तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की माझ्या श्वानाला कुत्रा म्हणून नका,’ असे म्हणत रायप्पन यांच्या छातीवर जोरात बुक्का मारला. त्यामुळे रायप्पन जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर डॅनियल व त्याचे कुटुंबातील सदस्य फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करीत असून हत्या करण्यामागे केवळ कुत्र्याचं कारण होत की आणखी काही? याचाही शोध घेतला जातोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dog, Viral, Viral news