नवी दिल्ली, 24 जानेवारी : सार्वजनिक वाचनालय असो किंवा शाळा-महाविद्यालयांमधील ग्रंथालयं, कोणत्याही ठिकाणी एकदा पुस्तक घेतल्यानंतर ते परत करावं लागतं. वाचण्यासाठी घेतलेली पुस्तकं परत करण्यासाठी एक ठराविक कालावधी निश्चित केलेला असतो. मात्र, अनेकजण पुस्तकं परत देण्यास उशीर करतात. काहीजण ग्रंथालयातून घेतलेलं पुस्तक परत करण्यास 10 ते 15 दिवस किंवा जास्तीतजास्त एक महिना उशीर करतात. पण, जर तुम्हाला कोणी सांगितलं की एका व्यक्तीनं 58 वर्षांनंतर लायब्ररीतील पुस्तक परत केलं तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे एकदम खरं आहे. इंग्लंडमधील एका व्यक्तीनं 58 वर्षांनंतर लायब्ररीतील पुस्तक परत केलं आहे. डेव्हिड हिकमन असं या व्यक्तीचं नाव आहे. 'एबीपी'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
ब्रिटनमधील मेट्रो न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, 76 वर्षांचे डेव्हिड हिकमन हे 58 वर्षांनंतर आपल्याकडील पुस्तक परत करण्यासाठी लायब्ररीमध्ये गेले होते. 1964 मध्ये इंग्लंडमधील डडली लायब्ररीमधून त्यांनी हे पुस्तक घेतलं होतं. एक व्यक्ती 58 वर्षांनंतर पुस्तक परत करण्यासाठी आल्याचं पाहून लायब्ररीरीतील कर्मचाऱ्यांनाही आश्चर्य वाटलं. पुस्तक उशिरा जमा केल्याचा दंड म्हणून, लायब्ररीनं डेव्हिड यांच्याकडून सुमारे 42 हजार 340 पाउंड म्हणजेच सुमारे 42.5 लाख रुपये वसूल केले. मात्र, नंतर ही दंडाची रक्कम परत करण्यात आली. डेव्हिड सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत. सध्या पेन्शन हाच त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे त्यामुळे दंडाची रक्कम परत केली असावी.
हेही वाचा - ओमकारच्या आत्मविश्वासाचा साक्षीदार झाला 'रायगड', पुण्याच्या पठ्ठ्यानं चक्क 'एका पायावर' सर केला गड!
1964 मध्ये झालेल्या अपघातानंतर घेतलं होतं पुस्तक
वृत्तानुसार, 1964 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी डेव्हिड यांनी लायब्ररीतून 'द लॉ फॉर मोटरिस्ट्स' हे पुस्तक घेतलं होतं. शहराचे तत्कालीन मेयर काउन्सलर डब्ल्यूजीके ग्रिफिथ्स यांच्या कारने दिलेल्या धडकेत डेव्हिड जखमी झाले होते. या अपघाताबद्दल डेव्हिड सांगतात, "मी त्यावेळी फोर्ड कारमध्ये बसलेलो होतो. त्या काळात ती खूप लोकप्रिय होती. या अपघातानंतर विरंगुळ्यासाठी मी हे पुस्तक लायब्ररीतून घेतलं होतं. अपघातानंतर काही काळ मी कायदेशीर बाबी निकाली काढण्यात व्यग्र होतो. यानंतर इतर कामांच्या नादात मी लायब्ररीचं पुस्तक परत करण्याची योजना पुढे ढकलली. त्यानंतर मी ते एका ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि लंडनला गेलो. या सर्व घडामोडींमध्ये मी पुस्तक परत करण्यास पूर्णपणे विसरलो."
गावी आल्यानंतर झाली आठवण
वयाच्या 76व्या वर्षी डेव्हिड या आठवड्यात त्यांच्या गावी परतले. तेव्हा त्यांना या पुस्तकाची आठवण झाली आणि त्यांनी ते परत करण्याचा निर्णय घेतला. नियमांनुसार, डेव्हिड यांना दिवसाला 20 पेन्स या हिशोबानं 42 हजार 340 पाउंडचा दंड ठोठावण्यात आला होता. पण, त्यांची कथा ऐकल्यानंतर लायब्ररीनं हा दंड माफ करण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Top trending, Viral, Viral news