उज्जैन 05 डिसेंबर : उज्जैनचं महाकाल मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशभरातीलच नाही, तर जगभरातील भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराचे काही नियम आहेत, त्यानुसार मंदिराच्या आतल्या भागाचे फोटो काढता येत नाहीत. इथे मंदिराचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशातच आता गर्भगृहात मोबाईल नेण्यासही मनाई करण्यात आली आहे. मंदिराच्या आतील अनेक व्हिडिओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, त्यातच सुरक्षा कर्मचार्यांचा समावेश असलेले काही व्हिडीओ व्हायरल झाल्याने मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
याबद्दल ‘हिंदुस्थान टाईम्स’ने वृत्त दिलंय. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मंदिरात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मंदिरात अशाच आणखी एका घटनेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा कर्मचार्यांना आता मोबाईल फोन बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे, असं वृत्त लाईव्ह हिंदुस्तानने दिलंय. महाकाल मंदिरातील डान्स व्हिडिओंमुळे चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग असलेली ही पहिलीच घटना आहे.
उज्जैनच्या महाकाल मंदिरातील दोन महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मंदिरात डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. pic.twitter.com/tl2jeVVupe
— News18Lokmat (@News18lokmat) December 5, 2022
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काळे कपडे घातलेल्या दोन महिला सुरक्षा कर्मचारी 'प्यार प्यार करते' आणि 'जीने के बहने लाखों' या हिंदी चित्रपट गीतांवर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. या शिवाय अलीकडेच, सोशल मीडियावर मंदिराच्या आणि गर्भगृहाच्या आतील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंमुळे मंदिरातील नियमांचा भंग झाल्याचं लक्षात आलंय. त्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
लक्ष्मीरूपी लेकीचा 'चमत्कार'! मुलीला जन्म देताच फळफळलं महिलेचं नशीब; बनली लखपती
नोव्हेंबरमध्ये, प्रशासनाने मंदिरातील गर्भगृहात फोटोग्राफी आणि मोबाईल फोनवर बंदी घातली होती. "महाकाल लोकोत्सवाच्या उद्घाटनानंतर भाविकांची संख्या वाढली आहे. गर्भगृहात येणारे भाविक सेल्फी घेतात आणि फोटो क्लिक करतात, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांना दर्शन घेताना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. फोटोग्राफीवर बंदी घालून आता आम्ही आमच्या पूर्वीच्या बंदीच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करत आहोत. मंदिराच्या गर्भगृहात मोबाईल आणि फोटो काढण्यास पूर्णपणे बंदी आहे," अशी माहिती उज्जैनचे जिल्हाधिकारी सिंह यांनी दिली.
दरम्यान, मंदिरात फोटोग्राफीवरच नाही, तर गर्भगृहात फोन नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. इतर भाविकांना यामुळे त्रास होतो आणि मंदिराच्या नियमांचं पालन होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मंदिरात डान्स करणाऱ्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही कामावरून काढून टाकण्यात आलंय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video