जयपूर 24 मार्च : इतिहास साक्षी आहे की आपल्या देशात प्रेमासाठी अनेकदा मोठमोठ्या व्यक्तींनी सर्व प्रकारच्या सुखसोयींचाही त्याग केला. अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्या आजही अगदी प्रत्येकाच्या तोंडी ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काहीशा प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची ही गोष्ट आहे. या मुलाचं अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर खूप प्रेम होतं. बारावीची परीक्षा पास झाल्यास शाळा सोडून बाहेर जावं लागेल, अशी भीती त्याला वाटत होती. यामुळे त्याला आपल्या गर्लफ्रेंडपासून दूर जावं लागलं असतं. हे टाळण्यासाठी या मुलाने अतिशय खतरनाक प्लॅन केला.
डुंगरपूर जिल्ह्यात इयत्ता 12 वीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याने बारावीत नापास झाल्यानंतर प्रेयसीसोबत शिकायला मिळेल म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. हे प्रकरण उघडकीस येताच कुटुंबीय आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 17 वर्षीय तरुण हा त्याच्या आजोबांकडे राहत असताना इयत्ता 12वीमध्ये संस्कृत विषयाचे शिक्षण घेत आहे.
स्टेजवर हार घालताना नवरदेवाची उतरली पॅन्ट, नववधूची भन्नाट रिएक्शन की... पाहा व्हिडीओ
बुधवारी त्याचा इंग्रजी विषयाचा पेपर होता. पुंजपूर सरकारी उच्च माध्यमिक शाळेत परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सकाळी साडेसात वाजता घरून निघाला, मात्र परीक्षा देण्यासाठी आलाच नाही. सकाळी आठ वाजता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी फोन करून कुटुंबीयांना सांगितलं की, विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आलेला नाही. यावर कुटुंबीयांनी पुंजपूर गाठून त्याचा शोध सुरू केला. यादरम्यान, पुंजपूर बसस्थानकावर असलेल्या एका दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनी रुमाल खरेदी करताना दिसला.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्याची कोणतीही खबर न लागल्याने नातेवाइकांनी दोवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. कुटुंबीय आणि पोलीस विद्यार्थ्याचा शोध घेत होते, त्यानंतर रात्री ९.३० वाजता विद्यार्थ्याने वडिलांना अज्ञात क्रमांकावरून फोन करून आपल्या अपहरणाची माहिती दिली. विद्यार्थ्याने सांगितलं की, पुंजपूरमध्ये अज्ञात लोकांनी त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि बेशुद्ध केलं. त्यानंतर त्याला काहीच आठवत नाही. विद्यार्थ्याने सांगितलं की, जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो गुजरातमधील अहमदाबाद येथे होता. माहिती मिळताच पोलीस आणि कुटुंबीयांनी अहमदाबाद गाठलं आणि विद्यार्थ्याला घेऊन दोवडा येथे परतले.
सुरुवातीला विद्यार्थी आपल्या अपहरणाची कहाणी सांगत राहिला. संशयावरून पोलिसांनी कसून चौकशी केली, त्यानंतर त्याने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला. विद्यार्थ्याने सांगितलं की त्याच शाळेत शिकणाऱ्या 11 वीच्या विद्यार्थिनीवर त्याचं प्रेम होतं. बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली असती, अशा परिस्थितीत नापास झाल्यानंतर त्याच शाळेत बारावीला प्रवेश घेऊन गर्लफ्रेंडसोबत शिकण्याचा बेत त्याने आखला होता. पोलिसांनी कलम 363 अन्वये गुन्हा दाखल करून विद्यार्थ्याला बाल कल्याण समितीच्या ताब्यात दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Love story, Viral news