बिजिंग, 04 जानेवारी: चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना ई कॉमर्सच्या जगताचे बादशाहा म्हटलं जातं ते अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. ऑक्टोबरमध्ये शांघाय इथे झालेल्या एका भाषणात जॅक मा यांनी चिनी सरकारी बँकेच्या आर्थिक नियमांवर ताशेरेमा रले होते. त्यामुळे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा रोष ओढावून घेतला होता. यांच्यातला वाद आता आंतराष्ट्रीय मुद्दा बनत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना कोणीही पाहिलं नसल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे.
काही दिवसांपूर्वी जॅक मा यांनी व्यवसायात नवनवीन संकल्पना आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांना लोकांना त्यांचं स्वातंत्र द्यावं आणि त्यांच्यावर सरकारी दडपण आणू नये, असं म्हटलं होत. तसेच त्यांनी जागतिक बँकिंगच्या नियमांना 'वृद्धांचा अड्डा' म्हणत खोचक टीकाही केली होती. या भाषणानंतर त्यांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. जॅक मा यांनी केलेली टीका कम्युनिस्ट पक्षाने स्वतः ला लावून घेतली आणि हा वाद वाढत गेला.
जिनपिंग यांच्या आदेशानंतर कठोर कारवाई करण्यात आली
नोव्हेंबर 2020 मध्ये चीनी सरकारने जॅकला जोरदार धक्का दिला. यावेळी चिनी अधिकाऱ्यांनी त्यांच्या एंट समुहाची $ 37 अब्ज डॉलरचा आयपीओ निलंबित केला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, हा आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आला होता. त्यांनतर अलीबाबा समूहाविरुद्ध सरकारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. शिवाय सर्व तपास पूर्ण होईपर्यंत जॅक यांना देश सोडून जाण्यास मज्जाव करण्यात आला.
ऑक्टोबरमध्ये त्यांना शेवटचं पाहिलं होतं
या प्रकरणानंतर वाद चिघळत गेला. जॅक मा यांना शेवटचं नोव्हेंबरमध्ये पाहिलं गेलं आहे. ते 'अफ्रिका बिझिनेस हीरोज' या टीव्ही कार्यक्रमांत दिसले हाते. त्यानंतर रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. गायब होण्यापूर्वी ते सतत त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काहीना काही ट्वीट करत असायचे. त्यांचं मतं प्रदर्शित करायचे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचं एकही ट्वीट समोर आलं नाही. त्यांचं शेवटचं ट्वीट 10 ऑक्टोबर रोजी आलं आहे. तेव्हापासून ते रहस्यमयरित्या गायब झाले आहेत. चिनी माध्यमं स्वतंत्र नाहीत. त्यामुळे अर्थातच चीनमध्ये मा यांच्या गायब होण्यासंदर्भात बातम्या आलेल्या नाहीत.