सावधान! कोरोनाच्या संकटात आता आणखी एका व्हायरसची एण्ट्री, आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू
दुसरीकडे टोळधाड आणि वादळासारख्या संकटातून भारत आपला मार्ग काढत असताना जगावर आता आणखी एका व्हायरसचं संकट आहे. या व्हायरसनं आतापर्यंत 5 लोकांचा जीवही घेतला आहे.
किन्शासा, 02 जून : जगभरात कोरोनानं (Coronavirus) थैमान घातलं आहे. दुसरीकडे टोळधाड आणि वादळासारख्या संकटातून भारत आपला मार्ग काढत असताना जगावर आता आणखी एका व्हायरसचं संकट आहे. या व्हायरसनं आतापर्यंत 5 लोकांचा जीवही घेतला आहे. हा व्हायरस आहे इबोला (Ebola Virus). आफ्रिकेत कोरोनाव्हायरसच्या दीड लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे आणि या संसर्गामुळे सुमारे 6 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात इबोला आजार पुन्हा आफ्रिका खंडात आला आहे.
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (DRC) मध्ये इबोला विषाणूची नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अलीकडेच या देशात इबोलाची प्रकरणं आढळली आहेत, परंतु या वेळी हा रोग पसरलेल्या ठिकाणाहून एक हजार किलोमीटरहून अधिक अंतरावर नवीन प्रकरणे आढळली असून या नव्या क्लस्टरची शक्यता व्यक्त केली जात आहे. WHOनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
A new #Ebola outbreak detected in western #DRC, near Mbandaka, Équateur province. @MinSanteRDC has identified 6 cases, of which 4 people have died. The country is also in final phase of battling Ebola in eastern DRC, #COVID19 & the world’s largest measles outbreak.
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) June 1, 2020
कॉंगोचे आरोग्यमंत्री इटेनी लाँगोंडो म्हणाले की, पश्चिमेकडील शहरातील म्बानडाकामध्ये इबोलामुळं 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, बाधित भागात डॉक्टर आणि औषधं पाठविली गेली आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोनं एप्रिलमध्ये इबोलामुक्त झाल्याची घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा या व्हायरसनं डोकं वर काढलं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, कॉंगोच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या मेबांका शहरात इबोला विषाणूची अनेक नवीन प्रकरणे येत आहेत. युनिसेफच्या म्हणण्यानुसार सोमवारपर्यंत इबोलामुळे 5 जणांचा मृत्यू झाला होता. केवळ महिनाभरापूर्वीच कॉंगोने जाहीर केले की देश इबोलामुक्त झाला आहे. इबोलामुळे 2 वर्षात 2275 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र आता कॉंगोचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. इबोला एवढ्या लांब कसा पोहचला आहे याचा शोध घेण्यात येत आहे, कारण मागील सर्व प्रकरणे उत्तर कॉंगोमध्ये आढळली होती.
कांगोमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इथं आतापर्यंत 3000 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 71 लोकांचा मृत्यू झाला आहे. WHOच्या म्हणण्यानुसार, कॉंगो आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये चाचणी किट आणि इतर आरोग्य सुविधांचा अभाव आहे. अशा परिस्थितीत संक्रमणाच्या बाबतीत अचानक वाढ होण्याची नोंद येथे नोंदविली जाऊ शकते. कॉंगोमध्ये खरसाचा उद्रेक देखील झाला आहे आणि जानेवारी 2019 पासून 3 लाख 50 हजार लोकांवर याचा परिणाम झाला आहे, तर 6500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.