'Too Much Skin', पायलटला ड्रेस खटकला म्हणून महिलेला विमानप्रवास नाकारला

'Too Much Skin', पायलटला ड्रेस खटकला म्हणून महिलेला विमानप्रवास नाकारला

ऑस्ट्रेलियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील एका एअरलाइन्सच्या विमानात महिला प्रवाशाला चढण्यापासून यासाठी रोखले गेले कारण तिने घातलेले कपडे विमानाच्या पायलटला आवडले नाहीत.

  • Share this:

19 जानेवारी: ऑस्ट्रेलियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील एका एअरलाइन्सच्या विमानात महिला प्रवाशाला चढण्यापासून यासाठी रोखले गेले कारण तिने घातलेले कपडे विमानाच्या पायलटला आवडले नाहीत. विमानाच्या पायलटला (Australian pilot) अशाप्रकारचे कपडे आवडत नसल्याचे सांगत या महिलेला तिने घातलेले कपडे बदलण्यास देखील सांगण्यात आले. ऑस्ट्रेलियात घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेडमध्ये ही घटना घडलीये. 23 वर्षीय कॅथरीन बॅम्पटन बुधवारी गोल्ड कोस्टमधील आपल्या घरी जाण्यासाठी अॅडिलेड एअरपोर्टवर (Adelaide Airport) पोहचली. या ठिकाणी एअरलाइन्स स्टाफच्या सदस्याने तिच्याशी संपर्क करत तिला फ्लाइट VA-1447 मधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगितले. तिने घातलेल्या आऊटफिटमुळे अंग प्रदर्शन होत असून पायलटला अशा प्रकार लोकांनी 'too much skin' दाखवणारे कपडे घातल्याचं आवडत नसल्याचं तिला सांगण्यात आलं. आणि तिला विमानातून प्रवास करण्यास नकार देण्यात आला.

News.com.au शी बोलताना कॅथरीन बॅम्पटनने सांगितले की, ' एअरलाइन्सच्या स्टाफने हे सांगितल्यानंतर मला मोठा धक्काच बसला. कारण मी जे कपडे घातले होते त्यामध्ये काहीच चूक नव्हते. माझ्या कपड्यामधून अंग प्रदर्शन होत नव्हते. एअरलाइन्सच्या स्टाफने मला ही गोष्ट सर्वांसमोर सांगितल्यामुळे मला खूप लाजल्यासारखे वाटले.' एअरलाइन्सच्या स्टाफने माझा अपमान केला तसंच त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने केलाय.

कॅथरीनने हाय नेक हॅल्टर टॉप, हाय वेस्ट ट्राऊजर घातली होती. तिचे हे कपडे एअरलाइन्सच्या स्टाफला न आवडल्यामुळे त्यांनी तिला दुसरा टॉप असेल तर तो परिधान कर असं सांगितलं. पण कॅथरीनकडे दुसरा टॉप नसल्यामुळे तिने त्यावर जॅकेट घातले. विमानात चढल्यानंतर कॅथरीनने क्रु मेंबरला माझ्या आऊटफिटमध्ये काय चूक आहे असा प्रश्न विचारला. त्यावर क्रू मेंबरने उत्तर दिले की, 'पायलटला जास्त अंग प्रदर्शन करणारे कपडे आवडत नाहीत.'

कॅथरीनने याबाबत एअरलाइन्सकडे तक्रार केलीये. तसंच तिने पायलटने माफी मागावी अशी देखील मागणी केलीये. व्हर्जिन ऑस्ट्रेलिया एअरलाइन्सने ( Virgin Australia Airlines) स्पष्टीकरण दिले आहे की, 'कॅथरीनने बिकिनी स्टाइल टॉप घातल्यामुळे स्टाफने गेट लाउंजमध्ये तिच्याशी संपर्क साधला होता.' दरम्यान, कॅथरीनची अशी इच्छा आहे की, 'एअरलाइन्सकडून इतर प्रवाशांना अशा प्रकारची वागणूक दिली जाऊ नये. तसंच त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्याची परवानगी देखील दिली जाऊ नये.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 19, 2021, 5:33 PM IST
Tags: australia

ताज्या बातम्या