अर्खंग्लेस्क (रशिया), 10 डिसेंबर : आंघोळ करताना फोन वापरणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती नुकतीच आली आहे. रशियातील (Rusia) एक महिला मोबाईल फोन चार्जिंगला लावून बाथटब (Bathtub) मध्ये आंघोळ करत होती. अचानक फोन बाथटब मध्ये पडल्याने करंट लागून या महिलेचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना रशियातील अर्खंग्लेस्क येथील आहे. ओलेस्या सेमेनोवा असं या महिलेचं नाव आहे. तिने तिचा आयफोन (iPhone8) चार्जिंगला लावला होता आणि हा फोन अचानक बाथटबमध्ये पडला. विजेचा तीव्र झटका बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
ओलेस्याचा मृतदेह सर्वात अगोदर तिची फ्लॅटमेट डारियाने पाहिला होते. डेरियाने इमर्जन्सी ऑपरेटरला सांगितलं की, जेव्हा मी घरी पोहोचले आणि हा मृतदेह पहिला तेव्हा मला धक्काच बसला. मी खुप मोठ्याने किंचाळले. मला काय करावं हेही सुचत नव्हतं. तिची परिस्थिती पाहून मला रडू कोसळलं. तिचा चेहरा फिकट पिवळा पडला होता आणि तिला श्वासही घेता येत नव्हता.
पॅरामेडिक्सच्या म्हणण्यानुसार, ओलेस्या ही एका कपड्यांच्या दुकानात काम करायची आणि चार्जिंग लावलेला फोन बाथटबमध्ये पडल्याने तिला प्राणाला मुकावे लागले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने एक चेतावणी जारी केली आहे. या चेतावणीत त्यांनी म्हटले आहे, तुम्ही पाण्यात असता तेव्हा इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळणे धोकादायक ठरू शकते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आपला मोबाइल फोनही एक विद्युत डिव्हाइस आहे. त्यामुळे आंघोल करताना फोन वापरणं धोकादायक आहे. आपण आपला स्मार्टफोन पाण्यात पडला तर, बहुतेकदा तो खराब होतो, पण तोच स्मार्टफोन चार्जिंगला लावलेला असेल तर जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे म्हणून कृपया अशा गोष्टी टाळा आणि स्वत: ला सुरक्षित ठेवा, असंही या चेतावणीत म्हटलं आहे.
यापूर्वी ऑगस्टमध्ये 15 वर्षीय एक शाळकरी मुलगी अॅनाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. मॉस्कोमध्ये राहणारी अॅना हिलाही आंघोळ करताना विजेचा शॉक लागला, त्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. तसेच मागील वर्षी प्रसिद्ध पोकर स्टार लिलिया नोव्हिकोवा हिलाही बाथरुमध्ये विजेचा शॉक लागला होता. ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला होता.