वॉशिंग्टन, 16 डिसेंबर : तान्ह्या बाळासाठी आईचं दूध म्हणजे अमृत आणि जीवदान असं म्हटलं जातं. तेच दूध एक चिमुकल्याच्या मृत्यूचं कारण ठरलं आहे. महिलेनं दूध पाजल्यानंतर मुलाचा काही वेळात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा घेऊन महिलेनं आपल्या पोटच्या तान्हुल्याला दूध पाजलं आणि घात झाला. अमेरिकेत एका महिलेवर अंमली पदार्थांचे सेवन केल्यानंतर 3 महिन्यांच्या मुलाला दूध पाजल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. 31 वर्षांच्या ऑटोम ब्लॉन्सेटमध्ये मेथमॅफेटामाइनचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळलं आहे. या अंमली पदार्थाला सोप्या भाषेत क्रिस्टल मेथ असंही म्हटलं जातं. हा पदार्थ एकदा घेतल्यानंतर माणूस त्यासोबत अॅडिक्टेड होतो. त्याचं व्यसन लागतं आणि त्याशिवाय जगणंही अशक्य वाटायला लागतं.
मुलगा हालचाल करत नाही हे समजताच महिलेनं तातडीनं वैद्यकीय मदत घेतली. वैद्यकीय पथक घरी दाखल झाल्यानंतर त्यांना चिमुकल्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळेना. त्यांनी या चिमुकल्याला तपासलं तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना देखील कळवण्यात आलं.
हे वाचा-दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून टवाळ तरुणांनी केली मारहाण, VIDEO VIRAL
पोलिसांनी या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शोधण्यास सुरुवात केली. 11 डिसेंबरला मिळालेल्या वैद्यकीय अहवालानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिमुकल्याची आई अर्थातच ऑटम या महिलेच्या शरीरात क्रिस्टल मेथचा डोस मोठ्या प्रमाणात आढळून आला. याशिवाय त्यांना गांजा देखील घेतला होता. या रिपोर्टनंतर या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान या महिलेनं मोठ्या प्रमाणात गांजाचे सेवन केले होते आणि त्यानंतर आपल्या तान्ह्या 3 महिन्यांच्या मुलाला ब्रेस्टफिडिंग केल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर आरोपी महिलेच्या घरातून ड्रग्स जप्त केले आहेत.
स्थानिक मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार अशाप्रकारे लहान मुलांचे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जानेवारी महिन्यात एक महिलेला अशाच प्रकरणात अटक करण्यात आली होती. पुन्हा 11 महिन्यांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.