वॉशिंग्टन, 06 जानेवारी : कोरोनासारख्या कठीण काळातही (Tough times) आपण आपल्या कामात खंड पडू न देता लोकांना सेवा द्यावी आणि त्याबदल्यात लोकांकडून विचित्र वागणूक मिळावी, असा अनुभव अमेरिकेतल्या एका वेट्रेसला (Waitress) आला आहे. रेस्तराँमधून जेवून बाहेर पडलेल्या ग्राहकाने बिलाच्या पावतीवर 'लर्न टू स्माइल' (Learn to smile) अर्थात 'हसायला शीक' असा अभिप्राय लिहिलेला तिला पाहायला मिळाला. अशा विचित्र अनुभवांमुळे आपला माणुसकीवरचा विश्वासच कधी कधी उडतो, असं या वेट्रेसने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलं आहे. 'द सन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
ही वेट्रेस अमेरिकेतल्या एका रेस्तराँमध्ये काम करते. कोरोनाबद्दलचे निर्बंध (Coronavirus) असल्यामुळे मास्क (Mask) परिधान करणे आता नित्याचेच झाले आहे. त्यामुळे तिच्याच काय, कोणाच्याच चेहऱ्यावरचे भाव समोरच्याला सहजासहजी कळू शकत नाहीत. असं असूनही एका ग्राहकाने आपल्याला हसायला शिकण्याचा सल्ला दिल्याबद्दल या वेट्रेसला वाईट वाटलं आहे. तिने रेडिट (Reddit) या सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट केली आहे. तसंच ग्राहकाने अभिप्राय लिहिलेल्या पावतीचाही (Receipt) फोटो काढून त्यासोबत शेअर केला आहे. त्यावर अनेकांनी तिच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, कोरोना काळातही (Pandemic Period) सेवा देत असलेल्या व्यक्तीबद्दल विनाकारण अशी प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
एका व्यक्तीने म्हटलं आहे, 'मी स्वतः वर्ष-दीड वर्ष वेट्रेस म्हणून काम केलं आहे. त्यामुळे तुला काय वाटलं असेल, याची मला कल्पना आहे. आपलं आरोग्य आणि आयुष्य पणाला लावून नोकरी करणं आणि सेवा देणं या गोष्टी अनेक जण करत नाहीत. तरीही असा अॅटिट्यूड चाळिशीतल्या अनेकांकडे असल्याचं मला दिसतं. तुझ्याबाबतीत जे काही झालं, त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतं.'
हे वाचा-OMG! छोट्याशा कारवरून नेल्या डजनभर सायकली, नेमका काय आहे जुगाड वाचा
या प्रतिक्रियेवर उत्तर देताना त्या वेट्रेसने म्हटलं, 'दुर्दैवाने हे अगदी सर्रास घडतं. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार.' या वेट्रेसने तिला एकदा कोरोनाचा संसर्ग होऊनही गेल्याची माहितीही दिली. त्यानंतर लोकांना तिच्याबद्दल अधिकच सहानुभूती वाटली.
'मी कामावर असतानाच काही महिन्यांपूर्वी मला कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे माझ्या शरीराची बरीच हानी झाली आहे. तरीही अशा विचित्र व्यक्तींचा सामना करणं हे माझ्यासाठी जवळपास नित्याचं आहे,' असं तिने लिहिलं आहे. 'अशा घटनांमुळे माझ्या काम करण्याच्या उत्साहावर परिणाम होतो आणि कधीकधी माणुसकीवरचा विश्वासही उडतो,' असंही तिने लिहिलं आहे.
'मला याबद्दल खूपच वाईट वाटतं आहे. काही लोक खरंच भयानक असतात आणि ते कधीच बदलणार नाहीत,' अशी प्रतिक्रिया आणखी एका युझरने व्यक्त केली आहे.
'नवा दिवस तुझ्यासाठी चांगले अनुभव घेऊन येवो. तुझ्या कामासाठी आभार आणि शुभेच्छा,' असंही त्याने म्हटलं आहे.
विनाकारण टोमणे मारणं हा काही जणांचा स्वभावच असतो; पण कोरोना काळातही जिवावर उदार होऊन सेवा देत असलेल्या व्यक्तींची अशी क्रूर थट्टा केली जाऊ नये, अशी या वेट्रेसची अपेक्षा असली तर चूक नाही. डॉक्टर्स किंवा पोलिस यांचं कार्य अधिक जोखमीचं आहे ही बाब योग्यच; पण वेटर्स, दुकानदार किंवा अन्य व्यावसायिकांना असलेला धोकाही कमी नाही. त्यामुळे त्यांचं मानसिक खच्चीकरण होईल अशा गोष्टी करू नयेत, असा सूर या निमित्ताने सोशल मीडियावर झालेल्या चर्चेतून निघाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.