ब्रासीलिया, 03 डिसेंबर: एखाद्या चित्रपटाप्रमाणे किंवा आताच प्रसिद्ध झालेल्या नेटफ्लिक्सची सीरिज मनी हाइस्ट (Money Heist) च्या एका सीनप्रमाणे घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. ब्राझीलमधील (Brazil) सांता कॅटरिना स्टेटमधील क्रिशूमा (Criciúma) शहरातून एक अजब प्रकरण समोर आलं आहे, जे की खूप फिल्मी आहे. याठिकाणी दरोडेखोरांच्या टोळीने प्रथम एक बँक लुटली आणि मग त्याठिकाणाहून पळ काढला. त्यावेळी त्यांनी लुटलेल्या रकमेपैकी सर्वाधिक पैसे शहरातील रस्त्यावर उधळले. त्या भागात ट्रॅफिक जाम झालं होतं, कारण अनेकांनी पडलेले पैसे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, या व्हिडीओतून असं स्पष्ट झालं आहे की, त्या चोरांनी काळ्या रंगाचे हुडी घातले होते आणि बँक लुटून निघत असताना त्यांनी 6 जणांना बंदी बनवलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेदरम्यान शहरातील विविध भागात गोळीबार झाला, यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. ग्लोबो टेलिव्हिजन नेटवर्कच्या म्हणण्यानुसार, 'किमान दहा गाड्यांमध्ये 30 गुन्हेगार होते आणि त्यांनी पोलिसांचा त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद केला होता.' या घटनेचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये कापण्यात आलेल्या बँकेचे Voult तसंच गुन्हेगारांच्या गाड्याही दिसल्या ज्यातून त्यांनी पलायन केलं.
ब्राझिलियन गायक-गीतकार जेल फ्लोरिझेल यांनी ट्विटरवर एक फुटेज शेअर केलं ज्यामध्ये लोक नोटांसाठी धावताना दिसत आहेत. त्यांनी ट्वीट केलं आहे की- 'ब्राझीलच्या क्रिशूमा शहरात झालेल्या मेगालूटीनंतर जमिनीवर पडलेल्या नोटा उचलताना नागरिक. या Tragedy नंतरही अनेकांचा ख्रिसमस चांगला होईल.'
शहराचे महापौर क्लासिओ साल्वारो यांनी ट्विटरवरून नागरिकांना घरात राहा आणि सतर्क राहा असं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना त्यांचं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. शहर लुटारूंच्या निशाण्यावर असल्याचं ते म्हणाले. दरम्यान लष्करी प्रशासन आणि सुरक्षा दलांद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. शहरातील सुमारे 3-4 ठिकाणी लूटमार झाल्याचे उघडकीस आले आहे. असे बोलले जात आहे की, शहराच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही आहे.