18 एप्रिल : मद्य सम्राट विजय मल्ल्याला आज अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली.विविध बँकांची 9 हजार कोटींची रक्कम त्यानं बुडवल्यानं भारतानं त्याला फरार घोषित केलं होतं.ही घोषणा होण्यापूर्वीच मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला होता.
सीबीआयच्या विनंती वरून इंटरपोलनं त्याला आज दुपारी अटक केली आणि त्याला वेस्टमिंस्टर कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं तीन तासानंतर त्याला जामीनही मंजूर केला. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कसर सोडणार नसल्याचं खासदार किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं.
मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारनं चालढकल केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मल्ल्याला अटक केली आता ललित मोदींना अटक करण्याची हिंमत भाजपनं दाखवावी असं आव्हान काँग्रेसनं केंद्र सरकारला दिलंय
सीबीआयनं मल्ल्याविरूध्द 1 हजार पानांचं आरोपपत्र भारतात दाखल केलंय. मात्र महत्वांच्या बँकांना गंडा घालणाऱ्या या कर्जबुडव्या मद्यसम्राटाला भारतात आणून शिक्षा ठोठावण्याचं आव्हान आता सीबीआयला पेलावं लागणार आहे.
विजय मल्ल्यावर कर्जाचा डोंगर
- स्टेट बँक ऑफ इंडिया - 1,468 कोटी
- पंजाब नॅशनल बँक - 1,500 कोटी
- आयडीबीआय बॅँक - 1,100 कोटी
- बँक ऑफ इंडिया - 650 कोटी
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 410 कोटी
- यूको बँक - 320 कोटी
- कॉर्पोरेशन बँक - 310 कोटी
- स्टेट बँक ऑफ म्हैसूर - 150 कोटी
- इंडियन ओव्हरसिज बँक - 140 कोटी
- फेडरल बँक - 90 कोटी
- पंजाब अँड सिंध बँक - 60 कोटी
- अॅक्सिस बँक - 50 कोटी
मल्ल्या भारतात येणार? कसं होतं प्रत्यार्पण?
- ब्रिटनचं विदेश मंत्रालय आणि कोर्टात यापुढची प्रक्रिया
- पुढच्या कारवाईसाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी हवी
- अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यार्पणाला सुरुवात
- प्रत्यार्पण करायचं किंवा नाही याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेतं
- आधी भारताला ब्रिटनकडे मल्ल्याविषयी रिपोर्ट द्यावा लागेल
- कोर्टाचं समाधान झाल्यावरच परराष्ट्र मंत्रालय प्रत्यार्पणाचा निर्णय घेऊ शकतं
- आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर प्रत्यार्पण नाही
- संबंधित देशाला आरोपीला फाशी होणार नाही अशी हमी द्यावी लागते
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा