Home /News /videsh /

स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, 'या' देशांमध्येही कडक आहेत नियम!

स्वित्झर्लंडमध्ये बुरख्यावर बंदी, 'या' देशांमध्येही कडक आहेत नियम!

स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) जनमत चाचणी घेऊन सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यास बंदी घातली गेली आहे. अजूनही अशे काही देश आहेत जिथे सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यास बंदी घातली गेली आहे.

नवी दिल्ली, 10 मार्च: स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) सार्वजनिक ठिकाणी बुरखा (burqa) वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय सरकरने घेतला आहे. स्वित्झर्लंडमधील उजव्या विचारसरणीच्या गटाने केलेल्या मागणीनुसार नुकतीच तिथे या विषयी जनमत चाचणी घेण्यात आली. इस्लामी पद्धतीमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास सांगितलं आहे. तशी परवानगी नागरिकांना द्यावी का? हा प्रश्न जनमत चाचणीमध्ये विचारण्यात आला. त्यात 51.2 टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यास बंदी घालावी, या बाजूने तर 48.8 टक्के लोकांनी या विरुद्ध मतदान केलं. त्यानंतर स्वित्झर्लंडच्या संविधानात (Swiss constitution) सुधारणा करुन बुरखा बंदीचा कायदा करण्यात आला. स्वित्झर्लंडमध्ये वाढणारी मिनारांची संख्या लक्षात घेऊन उजव्या विचारसरणीच्या गटाने 2009 मध्ये नवीन मिनार बांधण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याच गटाने बुरखाची बंदी मागणी केली होती. मतदानापूर्वी जनमत समतीचे अध्यक्ष आणि स्वित्झर्लंडच्या संसदेतील स्वीझ पीपल्स पार्टीचे खासदार वॉल्टर वोबमन म्हणाले, ‘स्वित्झर्लंडच्या परंपरेनुसार आम्ही चेहरा उघडा ठेवतो आणि आमच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेतील ही प्राथमिक बाब आहे. चेहरा झाकून घेणं हे राजकीय इस्लामीकरणाचं लक्षण आहे आणि हे राजकीय इस्लामीकरण युरोपमध्ये दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पण स्वित्झर्लंडमध्ये आम्ही त्याला थारा देणार नाही.' मुस्लिम गटाने या मतदानाचा निषेध करत त्याला आव्हान देणार असल्याचं सांगितलं. स्वित्झर्लंडमधील सेंट्रल कॉन्सिल ऑफ मुस्लिम संघटनेनं आपली भूमिका जाहीर करताना म्हटलं की, ‘आजच्या या निर्णयामुळे जुन्या जखमांवरील खपल्या काढल्या गेल्या आहेत. यामुळे कायदेशीर असंतुलन वाढत आहे. ज्यातून मुस्लिम अल्पसंख्य गटाला वाळीत टाकण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.’ या बंदीच्या अंमलबजावणीला विरोध करणार असून ज्या मुस्लिम महिलांना दंड ठोठावला जाईल त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी निधी गोळा करणार असल्याचं देखील या काउन्सिलनं स्पष्ट केलं. महत्वाचे म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये बुरखा घालणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी आहे. फक्त 30 महिला निकाब वापरतात, असा अंदाज ल्यूसर्न विद्यापीठानं व्यक्त केला आहे. स्वित्झर्लंडच्या एकूण 8.6 दशलक्ष लोकसंख्येपैकी 5 टक्के लोकं मुस्लिम आहेत. यासह स्वित्झर्लंड देश फ्रान्ससारख्या इतर देशांमध्ये सहभागी झाला आहे ज्या देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्वीस कॅनटनमध्ये आधीपासूनच चेहरा झाकण्यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी असलेल्या देशांवर आपण नजर टाकणार आहोत. हे वाचा -  'या' देशात पहिल्यांदाच महिला सैनिकांना सॅनिटरी उत्पादनांची सुविधा मिळणार फ्रान्स - 2011 मध्ये फ्रान्सनं कायद्याअंतर्गत चेहरा झाकण्यास बंदी घातली आहे. हा कायदा 2010 मध्ये फ्रान्सच्या सिनेटने पारित केला होता. या कायद्यानुसार मास्क, हेल्मेट, नकाब आणि चेहरा झाकला जाईल अशाप्रकारच्या अन्य गोष्टींचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणं, राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, सुरक्षा आणि लैंगिकता याबाबत चिंता निर्माण झाल्यामुळं बंदी बाबत फ्रान्समधील जनतेनं जोरदार चर्चा केली. बंदीबाबत वकिलांनी सांगितलं की, चेहरा झाकणं हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे कारण व्यक्ती ओळखण्यास अडथळा येतो आणि इस्लामिक पद्धतीनुसार महिलांना आपला चेहरा झाकण्यासाठी ‘सक्ती’ करणे हा अत्याचारीपणा आहे. दरम्यान, बंदीला विरोध करणारे म्हणाले की, 'हे वैयक्तिक स्वातंत्र्याला बाधा आणते.' बेल्जियम - 2011 पासून बेल्जियममध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरख्यासह आपला संपूर्ण चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दंड आणि सात दिवसांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. बल्जियममध्ये फक्त 10 लाख मुस्लिम असून त्यापैकी 300 महिला बुरखा आणि निकाब वापरतात. डेन्मार्क - डेन्मार्कमध्ये ऑगस्ट 2018 मध्ये पहिल्यांदाच बुरख्यावर बंदी घालण्यात आली. या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्याला 135 युरोपर्यंत दंड ठोठावला जातो. ऑस्ट्रिया - ऑस्ट्रियामध्ये कायद्यानुसार आपल्या चेहरा हेअरलाइन ते हनुवटीपर्यंत दिसला पाहिजे. कायद्यानुसार याला बुरखा घालण्याविरोधातील कायदा म्हणून ओळखले जाते. 2017 मध्ये बुरखा बंदी लागू करण्यात आली. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना 150 युरोपर्यंत दंड ठोठावला जातो. बल्गेरिया - बल्गेरियामध्ये 2016 पासून बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 750 युरोपर्यंत दंड ठोठावला जातो. याठिकाणी खेळाच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि घरातील प्रार्थनेच्या ठिकाणी सूट देण्यात आली आहे. नेदरलँड - नेदरलँडमध्ये सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 150 युरोपर्यंत दंड ठोठावला जातो. या ठिकाणी बुरखा घालण्यास, पूर्ण चेहऱ्यावर हेल्मेट घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 14 वर्षांच्या चर्चेनंतर ही बंदी लागू करण्यात आली होती.
First published:

Tags: France

पुढील बातम्या