87 तासांत फिरली 208 देश फिरली ही महिला; कसा होता भटकंतीचा अनुभव? वाचा
ताज महालपासून सिडनीपर्यंत या महिलेनं 87 तासात 208 देशात भटकंती केली आहे. तिच्या या प्रवासाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Record) नोंद करण्यात आली आहे.
मुंबई, 21 नोव्हेंबर: काही लोकांचं बिऱ्हाड त्यांच्या पाठीवर असतं. त्यांना फिरण्याची एवढी असते की, ते सतत भटकत असतात. तुम्ही कधी विचार केला आहे की, एखादी व्यक्ती 3 दिवसात 208 देश फिरू शकते. एका महिलेने खरंच हा कारनामा करुन दाखवला आहे. फक्त 3 दिवसात 208 देश आणि 7 लक्षद्वीपाची यात्रा तिनं केली. या महिलेचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.
डॉ. खावला अल रोमाथी असं या महिलेचं नाव आहे. डॉ. खावला दुबईची रहिवासी आहे. तिने 208 देश आणि 7 लक्षद्वीपांची भटकंती करण्यासाठी तिला 3 दिवस, 14 तास, 46 मिनिटं, 48 सेकंद लागले. डॉक्टर रोमाथीने 10 फेब्रुवारी 2020 रोजी भटकंतीला सुरुवात केली. आणि 13 फेब्रुवारीला तिचा प्रवास पूर्ण झाला. डॉ. खावला यांनी ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये शेवटचा मुक्काम केला. त्यांच्या या भन्नाट भटकंतीमुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे. खावला यांनी गिनीज बुकच्या सर्टिफिकेटसोबत फोटोही शेअर केला होता.
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना डॉक्टर खावला अल रोमाथी यांनी सांगितलं, 'हा प्रवास करणं माझ्यासाठी फारच कठीण होतं कारण अनेक ठिकाणांवर गेल्यावर असं वाटलं की, तिथून जाऊच नये पण मला माझं लक्ष्य पूर्ण करावं लागणार होतं. हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता.' विशेष म्हणजे या प्रवासात त्यांनी भारताच्या ताज महालालाही भेट दिली होती. त्यांनी ताज महालचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांच्या या जगावेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे.