US Election 2020 ट्रम्प यांच्या कुंडलीत पुन्हा आहे व्हाइट हाउसचा योग; काय वर्तवलंय भविष्य?

US Election 2020 ट्रम्प यांच्या कुंडलीत पुन्हा आहे व्हाइट हाउसचा योग; काय वर्तवलंय भविष्य?

US Presidential Election: अमेरिकेत मंगळवारी (3 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. भारतीय ज्योतिषांनी ट्रम्प आणि बायडेन यांच्या पत्रिकांवरून काय भविष्य वर्तवलंय वाचा...

  • Share this:

वॉशिंग्टन, 2 नोव्हेंबर : कोरोनाचा उद्रेक (Coronavirus Pandemic), ढासळलेली आर्थिक घडी, बेरोजगारीचा वाढता टक्का, वर्णद्वेषाची जळमटं अशा ग्रहपीडेतच अमेरिकेत मंगळवारी (3 नोव्हेंबर) राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक (US presidential election 2020) होत आहे.  अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा मागमूस जाणकारांनाही लागत नसला तरी भारतातील ज्योतिष्यांनी मात्र विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा दुसऱ्यांदा व्हाईट हाऊस प्रवेशाचा मार्ग सुकर असल्याचा होरा मांडला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुंडलीतील (Trump horoscope) दहाव्या घरातील सूर्य आणि गुरुची युती ट्रम्प यांना पुन्हा राजयोग असल्याचे दर्शविते, असं भाकीत या भविष्यवेत्त्यांनी केलं आहे.  या भारतीय ज्योतिषांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भाकीतं मांडली आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यासमोर तडगं आव्हान उभं केलं आहे. अमेरिकेतील गेल्या काळातील सर्वेक्षणं आणि पाहणी अहवालातही बायडेन यांचेच पारडे जड असल्याचे दिसून आले. आता प्रत्यक्ष मतदानात आणि राज्याच्या प्रतिनिधींच्या निवडीतून राष्ट्राध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याचा ठोस अंदाज राजकीय जाणकारांना अजून लागत नसल्याचं दिसतं. तथापि, भारतीय ज्योतिष्यकारांना मात्र ट्रम्प यांची ग्रहदशा विजयाकडे नेणारी असल्याची चिन्हं दिसत आहेत.  ट्रम्प यांच्या कुंडलीतील फलादेशाची मांडणी करून हे भाकीत वर्तवले जात आहे. त्यानुसार सूर्य दहाव्या घरात आहे आणि युतीत असलेल्या गुरुचे त्याला बळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या राशीला आगेकूच करणारा सिंह आहे. सूर्य दहाव्या घरात आहे. ड्रॅगनचे शिर असलेल्या राहूचाही वरदहस्त आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा तुरा पुन्हा एकदा ट्रम्प यांच्याच शिरपेचात खोवला जाईल, असा भविष्यवेत्त्याचा दावा आहे. एवढेच नाही तर उण्यापुऱ्या ४ लाख मतांनी ट्रम्प व्हाईट हाऊसचा गड काबीज करतील, असाही या ज्योतिर्विदाचा कयास आहे.

ट्रम्प जिंकतील, पण हा विजय त्यांच्यासाठी फारसा सुखावह नसेल. कारण काही दोषांचे खापरही त्यांच्या माथी फुटेल. मतं मॅनेज करणं, मतं हॅक करणं असे आरोप त्यांच्यावर होतील असाही योग दिसत असल्याचं भविष्यकाराचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात इ-मेलवरून झालेल्या मतदानात बायडेन यांचे पारडे झुकलेले दिसते. अद्याप मतदान केले नाही अशांची मते ट्रम्प यांच्या पारड्यात पडण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, मिडवेस्ट आणि विस्कोसिन व मिशिगन या राज्यांत बायडेन आघाडीवर असल्याचं सीएनएन वृत्तवाहिनीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणात म्हटलं आहे. अरिझोना आणि नॉर्थ कॅरोलिनात दोघांत काँटे की टक्कर होईल. 2016 मध्ये ट्रम्प यांनी या चारही राज्यांत बहुमत मिळवलं होतं.

आधी प्रत्यक्ष, ई-मेल आणि पोस्टाने केलेल्या मतदानात बायडेन आघाडीवर असल्याचं दिसतंय पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ट्रम्प यांना चांगली आघाडी मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार अरिझोनात बायडनना 50 तर ट्रम्पना 46 टक्के, विस्कॉन्सिन राज्यात बायडेनना 52 तर ट्रम्पना 44 टक्के, नॉर्थ कॅरोलिनात बायडेन यांना 51 तर ट्रम्पना 45 टक्के मतं मिळू शकतात. मिशिगनमध्ये बायडनना 53 तर 41 टक्के मतं ट्रम्पना मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निवडणूक निकालांनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 2, 2020, 10:18 PM IST

ताज्या बातम्या