सायनाइडहूनही घातक होतं ट्रम्प यांना पाठवलेलं विष; काही मिलिग्रॅमनंही जाऊ शकतो जीव

सायनाइडहूनही घातक होतं ट्रम्प यांना पाठवलेलं विष; काही मिलिग्रॅमनंही जाऊ शकतो जीव

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं समोर आलं होतं. आता या प्रकरणातली सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 22 सप्टेंबर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donal Trump) यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी एकाला अटकही झाली आहे. मागच्या आठवड्यात व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने एक पार्सल आलं. यामध्ये विषारी पत्र असल्यानं त्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.आता या प्रकरणातली सर्वात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ट्रम्प यांच्यासाठी आलेलं पार्सल त्यांच्यापर्यंत जाण्याआधी यामधील विषारी पदार्थाचा तपास लागल्याने मोठा अनर्थ टळला. हे बायोवेपन म्हणजे जैविक शस्त्र असल्याचा अंदाज आहे. यामध्ये रिसिन (Ricin) नावाचं विष होतं. या प्रकरणी आरोपीची चौकशी सुरू असून कॅनडाहून हे पार्सल आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पार्सलमध्ये  असलेलं विष हे अत्यंत भयंकर असून सायनाइडपेक्षाही घातक समजलं जातं. काय आहे हे Ricin आणि का आहे याची एवढी चर्चा?

रिसिन किती घातक?

रिसिन हे एक घातक विष असून एरंडाच्या बीमध्ये हे विष आढळून येतं. हे एकप्रकारे जैव हत्यार (Bio weapon) म्हणून वापरलं जातं. अनेकदा विरोधकांना मारण्यासाठी या विषाचा वापर या आधीही करण्यात आला आहे. सायनाइड या विषापेक्षाही रिसिन हे विष भयंकर असतं. या विषाचा वापर पावडर, गोळी किंवा असिडच्या रूपात केला जातो. अगदी थोड्या प्रमाणातही हे विष व्यक्तीच्या मृत्युला कारणीभूत ठरू शकते. हे विष इतकं घातक आहे की, कोणत्याही प्रकारे हे शरीरात गेल्यास लगेच परिणाम करायला सुरुवात करतं.

हे विष शरीरात गेल्यानंतर व्यक्तीला उलट्या सुरू होतात. त्याचबरोबर पोटात आणि आतड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील होतो. त्यामुळे यकृत, मूत्रपिंडही निकामी होऊ शकतं. नाकावाटे जर हे विष जर शरीरात गेलं तर तत्काळ याचा परिणाम दिसायला लागतो. श्वसन यंत्रणेमध्ये जाऊन त्यावर परिणाम करण्याचं काम हे विष करतं. आतापर्यंत या विषासाठी कोणतंही औषध सापडलं नसून चुकून हे शरीरात गेलं तर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे. अगदी 500 मिलिग्रॅम विष शरीरात गेलं तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

दरम्यान, या आधी देखील अशाच प्रकारे या विषाचा वापर करण्यात आला होता. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि अधिकाऱ्यांना रिसिन युक्त पत्र  पाठवल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर 2018 मध्ये दहशतवादी संघटना ISIS देखील अशाच हल्ल्याच्या तयारीत होती. मात्र एका दहशतवाद्याला अटक करण्यात आल्याने त्यांचा हा कट उघड झाला.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 22, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या